माझा भटकंती मधला हा एक आनंददायी, रोमहर्षक आणि दिव्य असा अनुभव होता.प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात मला व माझ्या मित्रांना छंद आहेत भटकंतीचा. सह्याद्रीच्या डोंगर रांगा, दऱ्याखोऱ्यात पालथे घालण्याचा त्याचप्रमाणे जंगलामध्ये फिरण्याचा दरवर्षी आम्ही मित्र ठिकठिकाणी ठिकाणी फिरायला जातो व त्या माध्यमातून जीवनाचा खऱ्याखुऱ्या अर्थाने आनंद घेतो.
दीपावलीच्या सुट्टीतच शेगाव, वर्धा ,आनंदवन ,हेमलकसा, नागपूर या ठिकाणी आम्हा मित्रांचे फिरायला जायचे ठरले होते.काही कारणामुळे फिरायला जाणे शक्य झाले नाही.25 डिसेंबर च्या दरम्यान जोडून सुट्टी आल्यामुळे आम्ही सर्व मित्र शेगाव ,वर्धा ,आनंदवन,माहूरगड या ठिकाणी फिरायला गेलो.त्यातील बोर अभयारण्य व त्यातील भटकंतीत सफारी माझ्या आणि माझ्या मित्रांच्या नेहमीच लक्षात राहील
विद्या विकास मंदिर राजुरी, विद्यालयाचा माजी विद्यार्थी मोहन नाईकवाडी(DFO) म्हणजेच लल्लु याला फोन करून आम्ही वर्धा या ठिकाणी फिरायला चाललो आहे हे सांगितले. त्यांनी तुम्ही वर्ध्याला जाताना बोर अभयारण्यात जंगल सफारीचा वेगळा, रोमहर्षक अनुभव घेता येईल असे सांगितले.त्याच्या सूचनेनुसार आम्ही निघालो खरे पण जंगलामध्ये 3 वाजता पोचलो. खरेतर जायला उशीर झाला होता कारण दोन वाजता जंगलामध्ये फिरायला जायचे असते.दोन हजार रुपयाची पावती फाडून एक गाईड बरोबर घेऊन आम्ही आमच्याच गाडीमध्ये जंगलामध्ये फिरायला गेलो.खरंतर जंगल अनुभवायचे, फिरण्याची ही तशी पहिलीच वेळ होती कारण हे प्राणी अभयारण्य होते.आमच्या बरोबर चा गाईड हां नावालाच होता वेळोवेळी फक्त सूचना सांगत होता खरं तर जंगले अनुभवायची डोळ्यांनी, जंगलातला आवाज टिपायचा तो कानांनी. जंगलामध्ये गेल्यावरती जंगलाचे नियम पाळायचे असतात. कारण हे जंगलात राज्य प्राण्यांचं, पक्षांचं आहे. जंगलांमध्ये चुकूनही बोलायचे नाही अर्थात आम्ही गाडीमध्ये काचा बंद करुन होतो त्यामुळे बाहेर आवाज जाणे शक्य नव्हते.
जंगलातून चालताना प्रथम आम्हाला दिसले ते म्हणजे मोर,भरपूर संख्येने असणारे मोर आमचे लक्ष वेधून घेत होते त्यांचे डौलदार चालणे, जंगलातील स्वच्छंदी फिरणे मला तर खूपच आवडले.गोपाळे सर गाडीचे सारथ्य करत होते. खाचखळग्यांचा चढ-उताराचा मार्ग असूनही गाडी अत्यंत नेहमीप्रमाणे सावध आणि सावकाश चालवत होते.त्यांच्या शेजारी बसून सुनिल पवार सर पुढच्या काचेतून खऱ्या अर्थाने जंगलाचा आनंद, अनुभव घेत होते.गाईड आमच्या शेजारीच बसल्यामुळे बसण्याची थोडी अडचण असली तरीही जंगलाचा आनंदापुढे ती अडचण मात्र कमी होती.गाईड मधून मधून न बोलण्याविषयी सूचना सांगत होता .चालता चालता अचानक नीलगाईचे दर्शन झाले.आणि नीलगाय बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने आमची सफर धन्य झाली असे मला वाटायला लागले.जंगलामध्ये शांतपणे प्रसन्नपणे करणारी ती नीलगाय बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने जंगलामधील वातावरण,त्यांचा तो आनंद,स्वच्छंदीपणा मला खूपच भावला.नीलगाय बरोबर तिचे वासरु आईच्या बरोबर शांतपणे चरत होते. मधून मधून आमच्या गाडीकडे टकमक बघत होते.थोडे पुढे गेल्यानंतर आम्हाला हरणाचे दर्शन झाले खरेतर हरीण जातीचे अनेक प्रकार असतात काळवीट, सांबर, चिंकारा इत्यादी .आम्ही जे हरणे बघितले त्याच्या अंगावर खूप खूप ठिपके होते.बहुतेक जंगलामध्ये अशीच हरणे आम्हाला बघायला मिळाली आता अधून-मधून मोर🦚🦚🦚🦚 गाडीला आडवा येऊन आमच्या पुढे नाचतो की काय ?असे वाटत होते, पण आम्हाला लाजून तो दूर पळून जात होता.सुंदर मोराचे रूप पाहून मी त्या सुंदर विधात्याचे आभार मानले की इतकी सुंदरता माेराला कशी दिली.
गाडी पुढे गेल्यानंतर सगळीकडे बोर, बोर आणि बोराची झाडे आम्हाला दिसली बोराला इतकी बोर 🍒🍒🍒🍒होती की ते पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले.मी तसं गाईडला म्हटले ही पण त्याने जंगलातील नियम आपण सर्वांनी पाळायचे असे म्हणून खाली उतरण्यास मनाई केली.अधून मधून माकड राज्यांचे दर्शन आम्हाला होत होते त्यांच्या या झाडावरून त्या झाडावरच्या मर्कट लीला चालू असतानाच एका ठिकाणी तर अजब दृश्य दिसले.एक माकड बोरीच्या झाडावरून बोरे खाली पाडून निलगायला खायला देत होते दोघांचं सहचर्य पाहून खूपच आनंद झाला व निसर्गातल्या काही कला आपणास शिकायला मिळतील काय? असे वाटले.
आमच्या पुढे चालणार्या जिप्सी यांचा वेग अचानक मंदावला व काहीतरी गोंधळ झाल्यासारखे वाटले म्हणून जंगलामध्ये काहीतरी आपल्याला वेगळे बघायला मिळेल याची खूणगाठ मनाशी निर्माण झाली काही वेळातच आमच्यासमोर अस्वल बघून जंगलातला स्वर्गीय आनंद झाला याच साठी केला होता की अट्टाहास असे वाटू लागले. अंगद उदमले सरांचा मोबाईल नवीन असल्यामुळे तेही अधून-मधून वेगळ्या पोज मध्ये फोटो घेत होते व त्यांना तशा प्रकारच्या सूचना गंगाधर सहाणे सर अधुन मधुन नेहमीप्रमाणे करत होते.किरण त्यांच्या नेहमीच्या स्वभावाला अनुसरून गाडीमध्ये शांतपणे काचेतून बाहेर बघत होते. खऱ्या अर्थाने आमची जंगल सफारी धन्य झाली असे वाटायला लागले असतानाच जंगलामध्ये आम्हाला जंगली डुकरे दिसली. त्यांची आई पुढे व त्यांच्या मागे त्यांची पिल्ले अशी सर्व काही तैनाती फौजेच्या कवायती प्रमाणे चाललेली होती. अधून मधून शत्रूंचा अंदाज घेत झालेली ती बघून जंगलामध्ये किती सावध राहावे लागते हे लक्षात येते.कारण कोणत्याही ठिकाणावरून शत्रू हल्ला करू शकतो. काळ नेहमी प्राण घेयाला टपलेला असतो.सभोवताली बोरांचा इतकाच टपारा पडलेला होता की मला तर वाटले काही बोरे उचलून त्याचा स्वाद घ्यावा पण तसे करणे जंगलाच्या नियमाच्या विरुद्ध होते व तसे करता येत नव्हते, कारण शेजारी गाईड बसलेला होता.जंगलामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये गाडीतून खाली उतरायची नाही असा त्यांचा दंडक होता. अगदी लघुशंकेसाठी गाडीच्या खाली उतरता येणार नाही ही सूचना त्यांनी आम्हाला गाडीत बसण्याच्या अगोदरच दिलेली होती. त्यामुळे तो तसे वागूही देत नव्हता.
जीवन म्हणजे काय व आनंद म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने जंगल अनुभवल्यानंतर व ते समजल्यानंतर आम्हाला कळाले.जंगलाची भाषा, जंगलाचे नियम हे सगळे वेगळे असतात त्यांनी त्यामध्ये मानवी हस्तक्षेप नसतो व तो करायचा पण नसतो हे आपल्याला पदोपदी जाणवते.थोड्याच वेळात धरणाचे बॅकवॉटर आम्हाला लागले आणि तिथे असंख्य प्राणी चरताना दिसले. अनेक प्राण्यांची मांदियाळी किंवा जत्राच मनानं याठिकाणी भरलेली होती तो संध्याकाळचा रम्य देखावा मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही ही निसर्गाची अनुभूती आम्हाला देवाने दिली असे म्हणावे का ?
मधूनच कधीतरी आम्हाला जंगली कोंबडा ही दिसायचा खरेतर जंगली कोंबडा डौलदार,रुबाबदार जंगलामध्ये फिरताना मला त्यांचाही हेवा वाटला.सूर्यनारायण हळूहळू कलायला लागले आम्हाला ते जणू सांगत होते आता परत फिरा कारण जंगलांमध्ये दिवसाचे व रात्रीचे नियम वेगळे नसतात जंगल हे जंगल असते, आणि म्हणून आम्ही आता ठरवले की आपण इथून काढता पाय घ्यावा.बंडू गाडी चालवायला असला की गाडीमध्ये निर्धास्त राहता येते शक्यतो तो गाडी चालवताना फारसा बोलत नाही त्याचा बहुतेक तो अलिखित नियमच असावा असे अनेक वर्षाच्या निरीक्षणावरून मला वाटते.नेहमीच आमच्याबरोबर असणारा मंगेश मात्र या ट्रीपला आमच्याबरोबर नव्हता त्याचा सहवास मात्र आम्ही चुकत होतो तो असता तर आणखी मजा आली असती आमचा गाईड आम्हाला सांगत होता की आपण फिरलो ते फक्त जंगलाच्या एकूण भागापैकी 25 टक्के भागात फिरलो, इतर भागांमध्ये जायला बंदी आहे कारण त्या भागामध्ये वाघ व इतर हिंस्र प्राणी आहेत आणि तशी वनखात्याने बंद केल्यामुळे आम्हाला तिकडे इच्छा असूनही जाता येत नव्हते पण जंगलामध्ये जे बघितले ते ही काही कमी नव्हते.जंगलातील सांबर, नीलगाय, जंगली कोंबडा, अस्वल व असंख्य वानरे माकडे बघितल्यानंतर मनोमन लल्लुचे व देवाचे आभार मानले .
बाहेर गेल्यानंतर आम्ही बहुतेक वेळा चिकन खातोच त्यादिवशी चिकन खाण्याची इच्छा झाली पण ऐनवेळेस ज्या ठिकाणी आम्ही मुक्कामाला थांबणार होतो त्यांनी रूम व जेवणाचे जास्त पैसे सांगितल्यामुळे आम्ही तिथून काढता पाय घेतला व वर्धा या ठिकाणी मुक्कामाला गेलो. बोर अभयारण्य लोकेशन
माझ्या मी सह्याद्री वेडा फेसबुक पेजवर जाण्यासाठी खालील लिंकचा वापर करा. मी सह्याद्री वेडा
कसे जाल.
1) वर्धा पासून 40 किमी
2) नागपूरपासून 65 किमी अंतरावर आहे.
श्री.अशोक राहिंज
विद्या विकास मंदिर राजुरी
तालुका जुन्नर जिल्हा पुणे