Tuesday, September 28, 2021

दुर्लक्षित तुळजा लेणी.जुन्नर

जुन्नर तालुका म्हटले की डोळ्यासमोर येतात हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि शिवनेरी या पलिकडे जुन्नरची ऐतिहासिक ओळख म्हणजे भारतातील सर्वात जास्त लेण्यांचा समूह जुन्नर तालुक्याला लाभला आहे. माझे मित्र श्री.दत्तात्रय पोखरकर सर मी काहींना कामानिमित्त जुन्नरला गेलो होतो पण काम न झाल्यामुळे आमचा मोर्चा वळला तो तुळजा लेणीकडे.
  प्रवासात अंगावर अंतर शिंपावे तसा अधून मधून पाऊस उत्साह वाढवत होता.आजूबाजूचे वातावरण पावसाळ्यामध्ये आणखीनच खुलून येते. मोटर सायकलवर जुन्नरहून मोजून दहा पंधरा मिनिटात लेण्यांच्या पायथ्याशी पोहोचलो. लेणीकडे जात असताना लांबूनच या लेण्या  आपले लक्ष वेधून घेतात. लेण्यांपर्यंत जायला रस्ता सोपा असला तरी या ठिकाणी फारशी गर्दी आढळत नाही कारण ही लेणी लोकांना अजूनही फारशी माहिती नाही. लेणी चा नजारा बघितल्यानंतर ही लेणी आपल्या नजरेतून सुटली कशी याचे नवल वाटल्याशिवाय राहिले नाही.
           असं म्हणतात की महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी म्हणजे तुळजा लेणी, बऱ्यापैकी पडझड झाली असली तरी जे आहे ते पाहून समाधान नक्कीच होते. भारतीय पुरातत्व खात्याच्या कर्मचाऱ्यांमुळे साफसफाई व्यवस्थित आहे. येथील स्तूप बऱ्यापैकी खराब झाला आहे. मात्र  अष्टकोनी बारा खांब आपले लक्ष वेधून घेतात. वरती गोलाकार घुमट अजूनही सुव्यवस्थित आहे.   बौद्ध भिक्षू साठी कोरलेले विहार  बऱ्यापैकी सुव्यवस्थित आहे. मात्र लेण्याच्या दर्शनी भागाची बर्‍यापैकी पडझड झाली आहे. एक-दोन ठिकाणी अजूनही नक्षीकाम सुव्यवस्थित दिसते. पूर्वी गुराखी किंवा किंवा मेंढ्या चारणारे मेंढके लोक जनावरे चारत असताना रानामध्ये  गल (छोटा खड्डा) करून त्यामध्ये गोल गोटे खेळायचे.
 तशाच पद्धतीने काही गली (छोटे खड्डे) विहारामध्ये आपणास दिसतात. ही लेणी सम्राट अशोकाच्या काळामध्ये कोरलेली असावी असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे .एका भिंतीवर काही वाक्य लिहिलेले आहे पण ते आपणास समजत नाही. एका लेणीमध्ये तुळजाई देवीचे मंदिर आहे त्यामुळे बहुतेक या लेणीला तुळजा लेणी म्हणत असावे.
             जुन्नर पासून साधारण  तीन किलोमीटर अंतरावर तुळजा लेणी असून स्वतःच्या गाडीने तिथे जावे लागते. पावसाळा व हिवाळा जाण्यासाठी उत्तम कालावधी. चढण अतिशय सोपी आहे. 
तुळजा लेणीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर जा 
          श्री.अशोक राहिंज.
     विद्या विकास मंदिर राजुरी. तालुका जुन्नर जिल्हा पुणे.     

अंबिका व भुतलिंग लेण्यासाठी खालील लिंक माझ्या मी सह्याद्री वेडा फेसबुक पेजच्या लिंक वर जा.



          मी सह्याद्री वेडा

Thursday, September 23, 2021

🏇🏽🎠निसर्गाचे नवल 'सांदण दरी

🏇🏽🎠निसर्गाचे नवल  'सांदण दरी '🌄    सांदण दरी ला जायचं सांदण दरी ला जायचं असं  कितीतरी दिवसापासून चाललं हाेतं बऱ्याच वेळा ठरवलं पण वेगवेगळ्या कारणांमुळे जाणं झालं नाही. नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न या म्हणीची पुरेपूर प्रत्र.त्रचिती आली होती .
णयमलयाडलददझण घमक्षत्रत्रादत्रत्ररघहहैत्रय      या वर्षाची शिवजयंती सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये करायची व शिवरायांना अभिवादन करायचे असे ठरविले .सर्व मित्रांना अगोदरच्या दिवशी  फोन केले. शिवजयंतीच्या दिवशी सकाळीच आळेफाट्यवरून  सहा वाजता सांदण दरीकडे कूच करण्याची ठरले.वाऱ्याच्या वेगाने संगमनेरला निघालो, योगायोगाने वाटेतच आमचे मित्र प्राध्यापक जोंधळे सर यांची भेट झाली.  ते व सहकारी शिवज्योत घेऊन गावी चालले होते. गाडीतून खाली उतरून काही वेळ शिवज्योत घेऊन धावलो . शिवज्योत घेऊन निघणाऱ्या मावळ्यांना शुभेच्छा दिल्या व पुढे भंडारदऱ्याच्या  मार्गाला लागलो.

                                            संगमनेर वरून फोन करून घाटघरचा असणारा गुडनर कुंडलिकला अकोल्याला रस्त्यावरच थांबायला सांगितले त्याला घेऊन  राजूरला हलकाफुलका नाष्टा करून पुन्हा  भंडारदर्‍याच्या दिशेने आमचा घोडा उधळला. आम्हाला अमृतेश्वराचे दर्शन घ्यायचे असल्यामुळे आम्ही रतनगडाच्या बाजूने निघालो.
   सांदण दरिकडे जाताना एका प्रवासी गाडीचे शंभर व प्रत्येक व्यक्ती तीस रूपयाची पावती फाडावी लागते . भंडारदराच्या बॅकवॉटरच्या कडेकडेने  अमृतेश्वर ला पोचलो.

                             समोर पसरलेला अथांग महासागर उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेला आहे उत्तर नगर जिल्ह्याची भरभराट झाली ती याच धरणामुळे अमृतेश्वर हे अकराव्या बाराव्या शतकातले महादेवाचे मंदिर असून हेमाडपंथी धाटणीचे आहे उत्कृष्ट शिल्पकला जर बघायचे असेल तरी या मंदिराला भेट नक्कीच  द्यायलाच हवी.  भोलेनाथ चे दर्शन घेत असताना एक गोष्ट नवलाईची वाटली ती म्हणजे महादेवाच्या पिंडीसमोर दोन नंदी आहेत .आत्तापर्यंत जिथे जिथे गेलो तिथे प्रत्येक पिंडीसमोर एकच नंदी असतो येथे दोन नंदी का आहेत? याचे मात्र कोडे  मनाच्या कप्प्यात तसेच आहे.धरणाच्या कडेला असलेले अमृतेश्वराचे मंदिर,आजूबाजूला सह्याद्रीच्या उंच-उंच रांगा, जंगलातल्या वेगळ्या फळांचा फुलांचा,पानाचा सुगंध आपणास मोहित करतो.  येथील पुष्करणी अतिशय सुंदर, वेगळ्या धाटणीची तीही आवर्जून बघायला हवी. हा परिसर अतिशय रमणीय,पवित्र निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. मंदिराची जागा निवडणा-याला  मनोमन सलाम केला.  कारण देवांचा वास रमणीय,पवित्र ठिकाणीच असतो म्हणून त्यांनी या जागेची निवड केली असावी.  या जागेवरून पाय हलत नव्हता पण मनात ओढ होती ती सांधण .दरीची त्यामुळे तेथे जास्त न रेंगाळता आम्ही पुन्हा सांधण दरीच्या दिशेने मार्गस्थ झालो. 

                              आळ्याफाट्यापासून जवळजवळ दीडशे किलोमीटर असलेल्या सांम्रद गावाजवळ आमच्या  रथाचे सारथ्य करणारे संतोष गोपाळे सर  यांनी गाडी थांबवली. माकडासारखे उड्या मारून गाडीच्या बाहेर आलो समोरचे अलंग, कुलंग, मलंग सह्याद्रीचे पहारेकरी आमच्याकडे माना वर करून बघत होते, कुणी परका तर आला नाही ना,  मावळेच आले याची खात्री पटल्यानंतर पुन्हा ते निर्धास्त झाले. प्रत्येकाने पाठीवरती आपापली बॅग घेतली. बॅगमध्ये पाण्याची बाटली डोक्यावर हॅट, डोळ्याला गाँगल, पायात शूज, डोक्यात सांदण दरीबाबतची उत्सुकता, हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या नावाने आरोळी देत दरी कडे निघालो. गाडी पार्क केल्यापासून  अगदी दहा मिनिटातच सांदण दरीला सुरुवात झाली. हा ट्रेक आहे तो पूर्ण उतरण्याचा, कुठे चढाई करायला लागत नाही पण दरीत उतरणे सोपं नाही हे सांधण दरी अनुभवल्यानंतर कळते छोटे छोटे गोटे दगडांनी  गोट्यांनी सुरू होणारी सांधण दरी काही वेळातच प्रचंड आकाराचे  राक्षसी  दगड खडक  आपली वाट अडवायला उभीच असतात.आपण जसजसे पुढे जातो तसतसा या दरीचा अनुभव थरारक असतो .अंगावर काटे येतात काही ठिकाणी दोन दगडांच्या पोकळीतून आपणास हळूहळू पुढे सरकावे लागते ही दरी बघितलं तर मला गोविंदाग्रजांच्या काही ओळी आठवलया

मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा 

प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा 

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा 

नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा

अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा.
                  किती सार्थ वर्णन केले आहे  सह्याद्रीचे नवल म्हणजे सांदण दरी….. एका अतिप्राचीन  भौगोलिक प्रस्तरभंग रेषा म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच... .हजारो वर्ष सह्याद्रीच्या डोंगर रांगा वरून वाहाणाऱ्या पाण्यांनी ही दरी आणखीन रुंदावली आहे, कापली आहे. दरीच्या दोन्ही बाजूला काळा कातळ भिंती मनाचा थरकाप उडवतात काही दगड पडण्याच्या परिस्थितीत आहे. जशी मोठ मोठे दगड  आपली  वाट अडवतात तसे अनेक ठिकाणी पाण्यातून पुढे जावे लागते नवीन माणसाला पाण्याचा अंदाज येत नाही . त्यामुळे हळूच एक पाय पाण्यात टाकला मग दुसरा मग तिसरा  भीती, नवल, आश्चर्य ,उत्सुकता सगळ्या गोष्टी एकाच वेळेस मी अनुभवत होतो पाण्यात चालता चालता अचानक छातीपर्यंत पाणी लागले अर्थात मागून काही मित्र धीर देत होते  पण आम्ही कधी हातात हात घेत, एकमेकांना धीर देत  पाण्याला पार करून गेलो. पाणी इतके थंड होते की मला माझ्या काश्मीरच्या प्रवासाची आठवण झाली. त्यावेळेस नद्या पार करताना प्रचंड थंड पाणी असायचे मला तर वाटले जास्त वेळ आपण पाण्यात राहिलो तर आपले पाय बधिर होईल मी पुढे गेल्यानंतर हळूहळू सुनिल पवार, अंगद उदमले  ,किरण औटी, हिरामण गोंदके यांची फौज पुढे आली  पण आमचे सारथ्य करणारे संतोष गोपाळे ,शंकर पवार, सिद्धू पवार हे मात्र मागेच थांबले बरोबर 12 वाजता आम्ही निम्मी सांदण दरी पार केली होती सांधण दरी म्हणजे उन सावल्यांचा खेळ. दोन्ही बाजू उंच असल्यामुळे सूर्यप्रकाश  लवकर येत नाही आला तरी लख्ख प्रकाश पडत नाही  हे दृश्य अतिशय सुंदर विलोभनीय अद्भुत आहे याचा अनुभव आपण घ्यायलाच हवा.  दरीत हवा बाहेर पेक्षा खूपच थंड असते.

                               सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळणे इतकं सोपं नाही आपण जसेजसे पुढे जातो तसतशी दोन्ही कडच्या भिंतींची उंची वाढत जाते काही ठिकाणी  हे भिंतीकडे दीडशे फुटापर्यंत आहे राकट .  कणखर सह्याद्री . . . आसमंताला भिडलेल्या उंचच उंच शिखरांचा सह्याद्री . . खोलच खोल द-या- खो-यांचा सह्याद्री,काळजाचा ठोका चुकविणान्या कोकणकडांचा सह्याद्री, . .हिमालयाची पाठराखण करणारा सह्याद्री, निसर्गसंपत्तीने नटलेला सह्याद्री, शिवरायांसारख्या वाघाला जन्म देणारा सह्याद्री. .किती किती सह्याद्रीची रुपये आपणास दिसतात .अर्थात नटलेला सह्याद्री बघायचा असेल तर  पावसाळ्यात जायला हवे अर्थात तुम्ही पावसात आले तर तुम्हाला सांधण दरी मध्ये उतरता येणार नाही कारण प्रचंड पाण्याचा दाब,घोंगावत येणारे पाणी त्याचे ते रौद्र रूप बघितल्यानंतर सह्याद्रीच्या पाण्याबरोबर दोन हात कोण करेल?  म्हणून ज्याला सांधण दरी वरून बघायची व निसर्गसौंदर्य लांबून अनुभवायचे बघायचे त्याने पावसाळात जायला हवे ; पण सांदण दरीच्या आत जायचे असेल तर डिसेंबर ते मार्च या कालावधीत गेल्यास तुम्हाला दरीमध्ये उतरून शेवटपर्यंत जाता येते .पाण्याला पार करत असतांना आम्ही शूज काढून ठेवल्यामुळे औटी किरण व मी अनवाणी पायानेच सांधण दरी पार केली हजार वर्ष या दरीतून पाणी वाहिल्यामुळे  दगडे एकमेकाला घासून  बर्‍यापैकी गोल गोल झाले आहेत आणि या वरुन चालताना काळजी घ्यावी लागते .काही ठिकाणी कपारीला घोरपडी सारखी बोटे रोवून भिंतीला आलिंगन देऊन एकेक पाय टाकून आपणास हळूहळू कासवासारखे पुढे सरकावे लागते. अजूनही दरी खूप पुढे होती पण खाली जायचं असेल तर या रॅपलिंग करावे लागते. ते साहित्य आमच्याकडे नसल्यामुळे व पोटात कावळे ओरडायला लागल्यामुळे घाटघरला जाण्याचा निर्णय घेतला. आमच्या बरोबर असलेल्या कुंडलीकला आम्ही आधीच जेवण बनवायला सांगितले होते. वाढण्याची तयारी होत असतानाच संतोष गोपाळे सर पेंगायला लागले इतक्या गर्दीत गडबडीत आवाजात त्यांना पेंगायला कशी येते हा प्रश्न माझ्यापुढे नेहमीच असतो.

        काही वेळाने गावाला चक्कर मारून आलो. अतिशय सुनियोजित असे नवे घाटघर गाव शासनाने वसवले आहे.फिरून येईपर्यंत जेवणाची ताटे तयार झाली होती. चिकन भाकरीवरती येथेच्छ ताव मारून गावाला वळसा घालून घाटण देवीचे दर्शन घेतले.येथे अहमदनगर जिल्हा संपतो व ठाणे जिल्हा सुरू होतो. समोरच अलंग मलंग कुलंग किल्ले आम्हास बोलावत होते, खुणावत तिथूनच त्यांना हात जोडले व परतीचा प्रवास सुरू केला आता मात्र  आम्ही ज्या बाजूने आलो त्याच्याविरुद्ध बाजूकडून म्हणजे कळसुबाईच्या बाजूकडे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आम्हाला साद घालत होते. पण एव्हाना खूपच संध्याकाळ झाली होती पुन्हा परिसर पायाखाली घालण्यासाठी सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळण्यासाठी आम्ही येणार होतो कळसुबाई कडे पाहत मला गीत आठवले भव्य हिमालय तुमचाअमुचा, केवळ माझा सह्यकडा

गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा 

तुमच्याअमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिवरथडी 

प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी 

मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला 

ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला 

धिक तुमचे स्वर्गहि साती 

इथली चुंबिन मी माती                                   

           # कसे जाल #  



1) पुण्यापासून आळेफाटा ,ओतुर ,ब्राह्मणवाडा, कोतुळ, भंडारदर्यामार्गे 194 किमी.

2) नाशिक वरून घोटीमार्गे 92 किमी आहे 

3) मुंबई ठाणे,आसनगाव ,इगतपुरी मार्गे 185 किमी  सांदण दरी आहे .

भंडारदरा जवळ असलेल्या शेंडी  मध्ये उत्कृष्ट प्रकारचे हॉटेल असून तेथे आपणास मुक्काम करता येतो . या शिवाय  सांदण दरीच्या शेजारी असलेल्या सांम्रद गावीही घरगुती जेवणाची व मुक्कामाची स्थानिक लोकांकडे सोय होऊ शकते.🙏🏻🙏🏻🌹19 .2.2019🙏🏻🙏🏻

  श्री. अशोक राहिंज.              
विद्या विकास मंदिर राजुरी . 
तालुका जुन्नर जिल्हा पुणे

Saturday, September 18, 2021

चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण

विद्या विकास मंदिर राजुरी.
       विद्यालयात दरवर्षी आपण विविध स्पर्धा आयोजित करत असतो , पण कोरोनामुळे यावर मर्यादा आल्यामुळे , विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी  गणेशोत्सवाच्या कालावधीत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
        
     विद्या विकास मंदिर, राजुरी
 
स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे होते.
 1)  महाराष्ट्रातील सण-उत्सव 
 2) निसर्ग चित्र
 3) तुमचे आवडते  चित्र
खुल्या गटामध्ये माजी विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ, चित्रकलेची आवड असणारे अनेक जण सहभागी झाले.
       अनेक चित्रकला प्रेमींनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. विद्यालयाच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद.
    या स्पर्धेसाठी आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था आळेफाटा यांनी दोन गटांसाठी, सर्वज्ञ हॉस्पिटलचे डॉ. स्वप्निल कोटकर यांनी एका गटासाठी व जनता विकास मंडळाचे संचालक श्री.मिलिंद औटी यांनी उत्तेजनार्थ बक्षिसाचे प्रायोजकत्व स्विकारले. विद्यालयाच्या वतीने त्यांना धन्यवाद.!
    प्रत्येक गटात  चार बक्षिसे काढण्यात आली. बक्षिसाचे वितरण आदर्श नागरी महिला पतसंस्थेचे संस्थापक श्री.बांगर साहेब,सर्वज्ञ हॉस्पिटलचे डॉक्टर श्री.स्वप्नील कोटकर व कलाप्रेमी श्री.भाऊसाहेब औटी या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री जी.के.औटी सर पर्यवेक्षक श्री.सुनिल पवार सर. श्री अशोक राहिंज सर, विज्ञान अध्यापक संघाचे सचिव श्री. वामन सर,ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. संतोष गोपाळे सर, श्री. गोंदके सर, श्री.उदमले सर,सौ अर्चना शहाणे मॅडम व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
        तिन्ही गटातील विजेत्यांसाठी समान आणि स्वतंत्र  बक्षिसे देण्यात आली. 
           लहान गट 
           प्रथम क्रमांक:
अभिनव प्रवीण औटी. 999 रुपये 
 
       
          व्दितीय क्रमांक:
      कार्तिकी विजय डौले 777 रुपये
        
         तृतीय क्रमांक:
     शमीम अन्वर फकीर.555 रुपये 


              उत्तेजनार्थ: 
प्रणाली जयसिंग औटी.251 रुपये
 
           मध्यम गट
           प्रथम क्रमांक :
      अभिषेक हरिदास हाडवळे 999 रुपये
     

           द्वितीय क्रमांक :
 साहिल संजय कदम 777 रुपये

          तृतीय क्रमांक :
     अनुष्का गायकर 555 रुपये

          उत्तेजनार्थ : 
    करीना प्रकाश जाधव 251 रुपये.

           खुला गट 
        प्रथम क्रमांक : 
    श्रद्धा रामदास हाडवळे 
           999 रुपये

        द्वितीय क्रमांक:
      प्रणिता प्रसाद काळे
           777 रुपये 

           तृतीय क्रमांक :
         आदित्य रामचंद्र औटी 
             555 रुपये

            उत्तेजनार्थ : 
      ईश्वरी सुनिल पवार 251 रुपये
     या प्रमाणे बक्षिसे दिली गेली. 
     विद्यालयाचे प्राचार्य श्री. जी.के.         औटी सर यांनी दीपावलीच्या कालावधीमध्ये विद्यालय भव्य किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करणार आहे
त्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे सांगितले.           चित्रकला स्पर्धेचे नियोजन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अशोक राहिंज सर यांनी केले. 

          श्री.अशोक राहिंज
         विद्या विकास मंदिर
      राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे 

मी सह्याद्री वेडा ब्लॉग वर जाण्यासाठी खालील लिंकवर जा.
         

Friday, September 17, 2021

हैद्राबादची निजामशाही

हैदराबादची निजामशाही.              
       
       17 सप्टेंबर म्हटले की, आपण लगेच नाव उच्चारतो “ मराठवाडा मुक्तिसंग्राम” ! आपल्या अज्ञानाची सुरुवातच मुळी याठिकाणाहून होते. कारण तो मराठवाडा मुक्तिसंग्राम नसून हैद्राबाद मुक्तिसंग्राम आहे. 1724 ते 1948 अशी सलग 224 वर्षे आपल्या भागावर हैदराबादच्या निजामाची सत्ता होती. मग हा निजाम म्हणजे कोण ? हेही माहीत असले पाहिजे. त्यानुसार निजाम हे काही कुठल्या व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. दिल्लीच्या मोगल बादशाहने आपला दक्षिणेचा सुभेदार मीर कमरुद्दीन खानाला निजाम उल मुल्क ही पदवी दिली होती. त्यामुळे त्याला निजाम म्हटले गेले. वास्तविक पाहता 200 वर्षात एकूण सात जणांनी निजामशाहिचा कारभार केला. आणि त्या प्रत्येकाने स्वत:ला निजाम ही पदवी लावली. त्यामुळे निजाम हे कोण्या एका व्यक्तीचे नाव नसून ती एक पदवी आहे. 
         निजाम या शब्दाचा अर्थ होतो व्यवस्थापक ! मुल्क म्हणजे जमीन किंवा परिसर. आणि त्यानुसार परिसराची व्यवस्था पाहणारा म्हणजेच निजाम. त्यानुसार दिल्लीच्या मोगल बादशहाचा दक्षिणेतील एक महसुली अधिकारी म्हणजेच निजाम. 1724 ला मोगलांचा  सुभेदार म्हणून काम करताना पहिला निजाम  मीर कमरुद्दीन खानाने औरंगाबाद याठिकाणी स्वत:ची स्वतंत्र गादी निर्माण केली. 1767 नंतर निजामाने आपला कारभार हैद्राबाद येथून चालवायला सुरुवात केली. निजाम हा धर्माने मुस्लीम असलातरी त्याच्याकडे अनेक नामांकित हिंदू सरदारांनी शेवटपर्यन्त चाकरी केलेली आहे. त्यात छत्रपती संभाजीच्या बहीणीचे नातू रावरंभा निंबाळकर, सेनापती धनाजी जाधवाचे पुत्र चंद्रसेन जाधव, फलटणच्या निंबाळकरांचे वारसदार सुलतानजी निंबाळकर, औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणणार्‍या हिम्मतबहाददूर विठोजी चव्हाणांचे चिरंजीव उदाजी चव्हाण यासारख्या दिग्गजांचा समावेश होतो. 
           15 ऑगस्ट 1947 म्हणजेच स्वातंत्र्यापर्यन्त भारतात निजामासारखी जवळपास 565 संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर बहुतेकांनी स्वत:ला भारतात विलीन करून घेतले. एक वर्ष उजाडलेतरी हैदराबादचा निजाम काही भारतात सामील व्हायला तयार नव्हता. त्यामुळे निजाम संस्थांनातील जनतेने निजामाविरोधात जो लढा दिला त्यालाच “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते. 1948 ला हैद्राबादच्या निजामाचे शासन हे देशातील सर्वात श्रीमंत संस्थान होते. 1941 च्या जनगणनेनुसार निजाम राज्याचे एकूण क्षेत्रफळ 82 हजार 694 चौरस मैल इतके होते. जे इंग्लंड आणि स्कॉटलंड देशाच्या दुप्पट भरते. या निजाम राजवटीत संपूर्ण आंध्र प्रदेश, तेलंगणा, मराठवाडा आणि दक्षिण कर्नाटकातील तीन जिल्हे मिळून एकूण 16 जिल्ह्याचा समावेश होता.  
            
 22 हजार 360 खेड्यात मिळून या संस्थानची लोकसंख्या 1 कोटी, 63 लाख, 38 हजार, 534 एवढी होती.  त्यात 85 % हिंदू तर 12 % मुस्लीम होते. त्यामुळे उर्दू भाषिकांची संख्या ही फक्त 10% असलीतरी राज्यकारभाराची भाषा उर्दूच होती. यावेळी मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यातील लोकसंख्या 52 लाख 19 हजार 528 होती. एकूण क्षेत्रफळाच्या 42 % भाग हा जमीनदाराच्याच मालकीचा होता. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील उस्मानाबाद, परंडा आणि कळंब हे तालुके निजामाचे सर्फेखास म्हणजे वैयक्तिक उत्पन्नाचे तालुके होते. तर या सोबतच गुंजोटी आणि लोहारा हे तालुके निजामाच्या पायग्याचे म्हणजे खाजगी संरक्षक पथकाच्या जहागिरीचे तालुके होते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा म्हणजे निजामाची खाजगी जहागीर होती. अशाप्रकारच्या जहागिरीतून निजामाला दरवर्षी 15 कोटीचे उत्पन्न मिळत होते. 
        हैद्राबाद संस्थानचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, 1883 पासून हे संस्थान इंग्रजांच्या धर्तीवर राज्यकारभार करणारे शासन असून मीर महेबूबअली पाशा हा मोठा सुधारणावादी धोरणाचा होता. त्यामुळे महसूल, अबकारी, अर्थ,कस्टम, स्टॅम्प, न्यायदान, तुरुंग, पोलिस, टपाल, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, रेल्वे याप्रमाणे 21 विभाग काढून त्याद्वारे गावपातळीपर्यंत प्रशासन व्यवस्था राबविली. त्यामुळे 1910 पर्यंत निजामाकडे  जमा होणारा महसूल हा 2 कोटी 89 लाख 43 हजार इतका होता. अगदी 2 आण्याचे नाणेही चांदीचे असून त्याचे वजन 1.39 ग्रॅम होते. त्यावर M आणि K अशी अक्षरे कोरलेली होती. M म्हणजे महबूब अली आणि K म्हणजे मुल्क. याशिवाय निजामाच्या काळात 16 आण्याचा 1 रुपया होता. त्यामुळेच त्याकाळी सोळा आणे काम झाले, अशाप्रकारची म्हण रूढ झाली. सहावा निजाम मीर महबूबअली हा येवढा शक्तीशाली होता की, इटली, फ्रांस, ओष्ट्रीया, इंग्लंड यासारख्या देशाचे राजपुत्र हे त्याचे खाजगी मित्र होते. 
        1910 पर्यंत गादीवर असणारा सहावा निजाम हा कपडे लत्ता आणि शिकारीचा शौकीन असून त्याने त्याकाळी एकदा वापरलेला ड्रेस पुन्हा कधी वापरला नाही. याचवेळी वारंवार पडणार्‍या दुष्काळामुळे सर्वसामान्य जनता ही अन्नावाचून तडफडून मरत होती. प्रशासन व्यवस्था ही आजच्याप्रमाणेच असून त्याकाळी जिल्हा अधिकार्‍याला तालुकदार म्हणत असत. गावचा कारभार हा पाटील आणि पटवारी यांच्या हातात होता. पोलिस, लष्कर, रेल्वे, टपाल वगैरे यंत्रणेमुळे निजामाचे शासन हे अगदी एखाद्या देशाच्या तोडीचे होते. म्हणूनच देशातील 565 संस्थानात 21 तोफाच्या सलामीचा मान हा म्हैसूर, बडोदा आणि हैदराबादच्या निजामाला होता. 
        1800 साली इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार केल्याने निजमावर पुर्णपणे इंग्रजांचे वर्चस्व असलेतरी निजामाने इंग्रजालाही झुलवत ठेवून आपला कार्यभाग साधून घेतला. संरक्षणाची जबाबदारी ही इंग्रजाकडे दिल्याने इंग्रजांनी हैद्राबादजवळ सैन्याची स्वतंत्र छावणी निर्माण केली. निजामाच्या मुलाच्या नावाने त्या भागाला सिंकंदराबाद हे नाव पडले. निजाम संस्थानचा कारभार हा एखाद्या देशाच्या कारभाराप्रमाणे असून 1870 साली आपल्या ताब्यातील प्रत्येक गावात निजामाने पिण्याच्या पाण्याकरिता अतिशय मजबूत अशा आडाची निर्मिती केली. ते आड आजही मराठवाड्यातील प्रत्येक गावात पहायला मिळतात. तर दुष्काळग्रस्त भागाकडेही त्यांचे लक्ष असून 1905 साली पडलेल्या दुष्काळात निजामाने 28000 रुपये खर्च करून तुळजापूरच्या घाटाचे काम पूर्ण केले. अशाप्रकारची अनेक कामे त्यांनी समाजासाठी पूर्णत्वास नेली. 
          1911 ते 1948 ला हैदराबादच्या गादीवर सातवा निजाम मिर उस्मानअली गादीवर असून तो जगातल्या 10 श्रीमंतापैकी एक होता. त्याच्याही कालखंडात हैद्राबाद संस्थानात अनेक सुधारणा होऊन छोट्या मोठ्या गावात शिक्षणाची सोय झाली. हैद्राबादला उस्मानिया विद्यापीठाची निर्मिती झाल्याने संस्थांनातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील गुंजोटीचे श्री कृष्ण विद्यालय 1921 सालचे आहे. निजाम राजवटीत विज्ञान आणि गणितबरोबरच अखलियात नावाचा विषय शिकणे अनिवार्य होते. ज्यात नीतीमत्तेचे धडे गिरवले जायचे, यात
नापास झालातर त्याला नाकाम अखलियात म्हटले जायचे. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे निजाम राजवटीतील प्राथमिक शिक्षण हे निशुल्क होते. शाळेतील प्रार्थना मात्र निजामाला दुवा मागण्याची असायची.
खिचर की उम्र हो तुझको
आना बख्त सिंकदर हो |
याचा अर्थ होतो “ दीर्घायु होऊ दे निजाम प्रभूला, हीच मागणी माझी ईश्वराला.”
       राज्यकर्ते मुस्लिम असलेतरी गावपातळीवर सर्वकाही व्यवस्थित होते. न्याय निवाडा निस्पक्क्षपाती होता. गावचा पाटील गावात न्याय द्यायचा. सरकारी कार्यालयाचा तसा संबंध यायचा नाही. परंतु आलाच तर तातडीने काम व्हायचे. रस्ते, रेल्वे यासारख्या सोयी झाल्याने माणसाचा संपर्क वाढला होता. निजामाची प्रशासनावरील पकड मजबूत असल्याने इथं चले जाव, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो ही गांधीजीची आंदोलने झाली नाहीत. दुसर्‍या महायुद्धांनंतर संपूर्ण भारत देश इंग्रजांच्या विरोधात पेटलेला असताना निजाम राजवटमात्र अगदी स्थिर होती. 1946 पर्यन्त सारकाही व्यवस्थित चालू होतं. 
        मध्येच रझाकार नावाच्या संघटनेचा उदय झाला आणि निजाम संस्थांनातील वातावरण पार बदलून गेले. निजाम राजवट बरी म्हणणारे लोकही आता रझाकारांचे बळी चालले. पाहता पाहता रझाकारांनी संपूर्ण हैद्राबाद संस्थान आपल्या हातात घेतले. 1946 ते 1948 अशी दोन वर्षे संपूर्ण जनता यांच्या अत्याचाराला बळी पडली. गावोगाव अन्याय अत्याचार याला सीमा राहिली नाही. एका बाजूला सारा हिंदुस्तान स्वातंत्र्याचा आनंद साजरा करतोय तर त्याचवेळी निजाम राजवटीतला माणूस जगण्यासाठी धडपडतोय अशा वातावरणात गावातील सर्वसामान्य माणूस जागा व्हायला लागला. आणि त्यातूनच भारतातील एक्या अदभूतपुर्व अशा लढ्याला सुरुवात झाली. त्याला “ हैद्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते. 
        सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संस्थानात उठावाला सुरुवात झाली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढ्याची सुरुवात झाली असलीतरी शेवटची 18 महिने ते तुरुंगातच होते. त्यामुळे निजामाच्या विरोधात आता एकसंघ उठवाबरोबरच गावोगावचा सर्वसामान्य माणूस पेटून उठला. त्यामुळे 1947 – 48 चा कालखंड हा संपूर्ण निजामशाहीसाठी आणि त्यातल्या त्यात उस्मानाबादसाठी अतिशय खडतर असा होता. रझाकारासारख्या अतिशय क्रूर संघटनेला सामान्य माणसाने अंगावर घेतले. आणि तेथूनच सुरू झाला सूडाचा प्रवास. जे शिकले त्यांचा इतिहास पुस्तकात आला परंतु अनेक  अशी मंडळी आहे त्यांना अजूनही इतिहासाने न्याय दिला नाही. एका एका गावची 15 - 20 माणसं रझाकारांनी कापून काढली, जीवंत जाळली तरी त्याची कुठे नोंद नाही. म्हणूनच उस्मानाबाद आकाशवाणीच्यावतीने “ हैद्राबाद मुक्तिसंग्रामात, असे झुंजलो आम्ही ” नावाची मालिका सादर करून दुर्लक्षित इतिहास आपल्या समोर मांडला जाईल. अशा या दुर्लक्षित वीरांना समाजासमोर मांडणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. 
                  प्रा. डॉ. सतीश कदम, उस्मानाबाद, ९४२२६५००४४



लालपरी पळली पाहिजे.

पूर्वी गावांमधील लालपरी म्हणजेच एसटी यायची तेव्हा तिच्या स्वागतासाठी आबालवृद्ध हजर असायचे. आपल्या गावांमध्ये एसटी येते याचा त्यांना अभिमान  ...