Sunday, November 14, 2021

लालपरी पळली पाहिजे.

पूर्वी गावांमधील लालपरी म्हणजेच एसटी यायची तेव्हा तिच्या स्वागतासाठी आबालवृद्ध हजर असायचे. आपल्या गावांमध्ये एसटी येते याचा त्यांना अभिमान  त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असे.
       भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रान्सपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.
बीएसआरटीसीची पहिली बस १ जून १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली.पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निजाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू राहिला.
  आज एसटी महामंडळाकडे  जवळजवळ 20000 बसचा ताफा असून 8.7 दशलक्ष किलोमीटर गाड्या धावतात. अनेक ठिकाणी एसटी महामंडळाचे स्वतःच्या मालकीची जमीन असून तिची किंमत करोडो रुपयांमध्ये होईल. असं सर्व असताना ती नेहमीच आजारी पडते याचे सर्वसामान्य माणसांना दुःख आहे.
               ज्या गावांमध्ये  एसटी जाते त्या गावांमध्ये मुली द्यायला लोक सहज तयार व्हायचे. बघता बघता एसटी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पर्यंत जाऊन पोचली, आणि दळणवळणाची वाहतुकीची सोय उपलब्ध झाली.
       ग्रामीण भागात ज्या गाव मध्ये एसटी जायची त्या एसटीचे कंडक्टर आणि ड्रायवर ठरलेले असायचे. हे ड्रायव्हर कंडक्टर त्या गावातील एक होऊन जायचे, त्यांच्यात भावनिक नाते होऊन जायचं. आपल्या गावात हे लोक येतात, सेवा देतात. आपल्यासाठी हे देवदूतच आहे हे त्यांना वाटायचे.  वेळप्रसंगी जेवणाखाण्याची सोय ही गावकरी करत असत. टेन जमत संदेशवहनाची, सुखदुःखाची माहिती कळत असत. तालुक्याचा ठिकाणी कामाला जाणे असो वा दवाखान्यात जाणे असो, एसटीने सर्वांनाचं मदतीचा हात दिला आहे. गोरगरीब मुलींचे शिक्षण, वृद्ध लोकांचे येणे जाणे, शाळकरी कॉलेजच्या मुलांचे डबे पोहोचवणे,ग्रामीण भागात सामान वाहणे अशी अनेक कामं एसटी करत आली.  काळ बदलला, वाहतुकीची साधने बदलली पण सामान्य माणसाचं लालपरीवरचं प्रेम कमी झालं नाही. संप, मोर्चे, उपोषण, दंगली यात ती नेहमीच लक्ष ठरत गेली पण सामान्य माणसाने तिच्यावर कधी हात उगारला नाही. ही एसटी सामान्य माणसांच्या घराघरापर्यंत मनापर्यंत आणि अगदी हृदयात जाऊन बसली. आम्ही आजही एसटीचा प्रवास सुरक्षित आहे असं जनसामान्य माणसांचा मत आहे.
    शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या तीन प्रकारच्या वातानुकूलित आरामसेवा एसटी चालवीत आहे.प्रामुख्याने महाराष्ट्रातील महानगरांदरम्यान या सेवा चालवल्या जातात.२०१७ पासून महामंडळाने 'शिवशाही' या नव्या आसन व शयनयान श्रेणीतील बसेस ताफ्यात आणल्या आहेत. तरीही सर्वसामान्यांची आवडती आहे ती लालपरीच. 
     सर्व जग बदललं पण एसटी कंडक्टर ड्रायव्हर बदलला नाही.  कुटुंबाच्या अपेक्षा तुटपुंज्या पगारात पूर्ण न करता आल्यामुळे अनेक ठिकाणी एसटी कर्मचारी आत्महत्या करायला लागले. . एसटी प्रमाणे कर्मचाऱ्यांचीही मनही खंगत गेले.आत्तापर्यंत 28 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली आहे.
 अनेक खाजगी, व्यवसायिक ट्रॅव्हल कंपन्या फायद्यात चालत असताना एसटीच्या फायद्याचा मलिदा कोण खातं याचं कोडं उलगडत नाही. जाणीवपूर्वक एसटीचे चाक बंद करण्याचे  षडयंत्र कोणी आखत तर नाही ना.? हजारो कोटीची मालमत्ता एसटीची असताना एसटी तोट्यात कशी जाऊ शकते, सध्या एसटीचा संचित तोटा 12 हजार 27 कोटी रुपये आहे. याचे कोडे सामान्य माणसाला उलगडता उलगडत नाही. कोट्यवधी जनतेच्या हृदयावर राज्य करणारी लालपरी हळूहळू डोळ्यासमोर भिष्मा सारखी शरपंजरी दिसते आहे. तिला जीवनदान देणारा ( पाणी पाजणारा ) अर्जुनासारख्या खमक्या  नेतृत्वाची ( योद्ध्याची) गरज आहे. एसटीच्या बारा विभागातून जवळपास 1 लाख 7 हजार कर्मचारी काम करतात.
एसटीचे चाक संपूर्ण महाराष्ट्रात बंद होत असताना राजकारण मात्र जोरात सुरू आहे. चुक कोण, बरोबर कोण हा प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी एसटी गावागावापर्यंत चालली पाहिजे नव्हे तर पळली पाहिजे. जनसामान्यांच्या मनावर राज्य करणारी लालपरी कोणत्याही परिस्थितीमध्ये रुसता कामा नये. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा,पण एसटीच्या चाकाचा  खडखडाट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुन्हा घुमु दे.

श्री. अशोक राहिंज सर

Monday, October 4, 2021

बोर प्राणी अभयारण्य

महाराष्ट्रातील एक छान प्राणी अभयारण्य म्हणजे वर्धा जिल्ह्यातील बोर प्राणी अभयारण्य वर्धा शहरापासून जवळ जवळ तीस ते एकतीस किलोमीटर अंतरावर असलेले निसर्गाचा  सुंदर अविष्कार असलेले अभयारण्य म्हणजे 'बोर प्राणी अभयारण्य.' प्रचंड मोठा विस्तार असलेले हे प्राणी अभयारण्य बघायला मोकळा वेळ  हवा.आम्हाला जायचे होते ताडोबाला पण गेलो बोर प्राणी अभयारण्यात.
       माझा भटकंती मधला हा एक आनंददायी, रोमहर्षक आणि दिव्य असा अनुभव होता.प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात मला व माझ्या मित्रांना छंद आहेत भटकंतीचा. सह्याद्रीच्या डोंगर रांगा, दऱ्याखोऱ्यात पालथे घालण्याचा त्याचप्रमाणे जंगलामध्ये फिरण्याचा दरवर्षी आम्ही मित्र ठिकठिकाणी ठिकाणी फिरायला जातो व त्या माध्यमातून जीवनाचा खऱ्याखुऱ्या अर्थाने आनंद घेतो.
   दीपावलीच्या सुट्टीतच शेगाव, वर्धा ,आनंदवन ,हेमलकसा, नागपूर या ठिकाणी आम्हा मित्रांचे फिरायला जायचे ठरले होते.काही कारणामुळे फिरायला जाणे शक्य झाले नाही.25 डिसेंबर च्या दरम्यान जोडून सुट्टी आल्यामुळे आम्ही सर्व मित्र शेगाव ,वर्धा ,आनंदवन,माहूरगड या ठिकाणी फिरायला गेलो.त्यातील बोर अभयारण्य व त्यातील भटकंतीत सफारी माझ्या आणि माझ्या मित्रांच्या नेहमीच लक्षात राहील
 विद्या विकास मंदिर राजुरी, विद्यालयाचा माजी विद्यार्थी मोहन नाईकवाडी(DFO) म्हणजेच लल्लु याला फोन करून आम्ही वर्धा या ठिकाणी फिरायला चाललो आहे हे सांगितले. त्यांनी तुम्ही वर्ध्याला जाताना बोर अभयारण्यात जंगल सफारीचा वेगळा, रोमहर्षक अनुभव  घेता येईल असे सांगितले.त्याच्या सूचनेनुसार आम्ही निघालो खरे पण जंगलामध्ये   3 वाजता पोचलो. खरेतर जायला उशीर झाला होता कारण दोन वाजता जंगलामध्ये फिरायला जायचे असते.दोन हजार रुपयाची पावती फाडून एक गाईड बरोबर घेऊन आम्ही आमच्याच गाडीमध्ये जंगलामध्ये फिरायला गेलो.खरंतर जंगल अनुभवायचे, फिरण्याची ही तशी पहिलीच वेळ होती कारण हे प्राणी अभयारण्य होते.आमच्या बरोबर चा गाईड हां नावालाच होता वेळोवेळी फक्त सूचना सांगत होता खरं तर जंगले अनुभवायची डोळ्यांनी,  जंगलातला आवाज टिपायचा तो कानांनी.  जंगलामध्ये गेल्यावरती जंगलाचे नियम पाळायचे असतात. कारण हे जंगलात राज्य प्राण्यांचं, पक्षांचं आहे. जंगलांमध्ये चुकूनही बोलायचे नाही अर्थात आम्ही गाडीमध्ये काचा बंद करुन होतो त्यामुळे बाहेर आवाज जाणे शक्य नव्हते.
            जंगलातून चालताना प्रथम आम्हाला दिसले ते म्हणजे मोर,भरपूर संख्येने असणारे मोर आमचे लक्ष वेधून घेत होते त्यांचे डौलदार चालणे, जंगलातील स्वच्छंदी फिरणे मला तर खूपच आवडले.गोपाळे सर गाडीचे सारथ्य करत होते. खाचखळग्यांचा चढ-उताराचा मार्ग असूनही गाडी अत्यंत नेहमीप्रमाणे सावध आणि सावकाश चालवत होते.त्यांच्या शेजारी बसून सुनिल पवार सर पुढच्या काचेतून खऱ्या अर्थाने जंगलाचा आनंद, अनुभव घेत होते.गाईड आमच्या शेजारीच बसल्यामुळे बसण्याची थोडी अडचण असली तरीही जंगलाचा आनंदापुढे ती अडचण मात्र कमी होती.गाईड मधून मधून न बोलण्याविषयी सूचना सांगत होता .चालता चालता अचानक नीलगाईचे दर्शन झाले.आणि नीलगाय बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने आमची सफर धन्य झाली असे मला वाटायला लागले.जंगलामध्ये शांतपणे प्रसन्नपणे करणारी ती नीलगाय बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने जंगलामधील वातावरण,त्यांचा तो आनंद,स्वच्छंदीपणा मला खूपच भावला.नीलगाय बरोबर तिचे वासरु आईच्या बरोबर शांतपणे  चरत होते. मधून मधून आमच्या गाडीकडे टकमक बघत होते.थोडे पुढे गेल्यानंतर आम्हाला हरणाचे दर्शन झाले खरेतर हरीण जातीचे अनेक प्रकार असतात काळवीट, सांबर, चिंकारा इत्यादी .आम्ही जे हरणे बघितले  त्याच्या अंगावर खूप खूप  ठिपके होते.बहुतेक जंगलामध्ये अशीच हरणे आम्हाला बघायला मिळाली आता अधून-मधून मोर🦚🦚🦚🦚 गाडीला आडवा येऊन आमच्या पुढे नाचतो की काय ?असे वाटत होते, पण आम्हाला लाजून तो दूर पळून जात होता.सुंदर मोराचे रूप पाहून मी त्या सुंदर विधात्याचे आभार मानले की इतकी सुंदरता माेराला कशी दिली.
     गाडी पुढे गेल्यानंतर सगळीकडे बोर, बोर आणि बोराची झाडे आम्हाला दिसली बोराला इतकी बोर 🍒🍒🍒🍒होती की ते पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले.मी तसं गाईडला म्हटले ही पण त्याने जंगलातील नियम आपण सर्वांनी पाळायचे असे म्हणून खाली उतरण्यास मनाई  केली.अधून मधून माकड राज्यांचे दर्शन आम्हाला होत होते त्यांच्या या झाडावरून त्या झाडावरच्या मर्कट लीला चालू असतानाच एका ठिकाणी तर अजब दृश्य दिसले.एक माकड बोरीच्या झाडावरून बोरे खाली पाडून निलगायला खायला देत होते दोघांचं सहचर्य पाहून खूपच आनंद झाला व निसर्गातल्या काही कला आपणास शिकायला मिळतील काय? असे वाटले.
    आमच्या पुढे चालणार्‍या जिप्सी यांचा वेग अचानक मंदावला व काहीतरी गोंधळ झाल्यासारखे वाटले म्हणून जंगलामध्ये काहीतरी आपल्याला वेगळे बघायला मिळेल याची खूणगाठ मनाशी निर्माण झाली काही वेळातच आमच्यासमोर अस्वल बघून जंगलातला स्वर्गीय आनंद झाला याच साठी केला होता की अट्टाहास असे वाटू लागले. अंगद उदमले सरांचा मोबाईल नवीन असल्यामुळे तेही अधून-मधून वेगळ्या पोज मध्ये फोटो घेत होते व त्यांना तशा प्रकारच्या सूचना गंगाधर सहाणे सर अधुन मधुन नेहमीप्रमाणे करत होते.किरण त्यांच्या नेहमीच्या स्वभावाला अनुसरून गाडीमध्ये शांतपणे काचेतून बाहेर बघत होते. खऱ्या अर्थाने आमची जंगल सफारी धन्य झाली असे वाटायला लागले असतानाच जंगलामध्ये आम्हाला जंगली डुकरे दिसली. त्यांची आई पुढे व त्यांच्या मागे त्यांची पिल्ले अशी सर्व काही तैनाती फौजेच्या कवायती प्रमाणे चाललेली होती. अधून मधून शत्रूंचा अंदाज घेत झालेली ती बघून जंगलामध्ये किती सावध राहावे लागते हे लक्षात येते.कारण कोणत्याही ठिकाणावरून शत्रू हल्ला करू शकतो.  काळ नेहमी प्राण घेयाला टपलेला असतो.सभोवताली बोरांचा इतकाच टपारा पडलेला होता की मला तर वाटले काही बोरे उचलून त्याचा स्वाद घ्यावा पण तसे करणे जंगलाच्या नियमाच्या विरुद्ध होते व तसे करता येत नव्हते, कारण शेजारी गाईड बसलेला होता.जंगलामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये गाडीतून खाली उतरायची नाही असा त्यांचा दंडक होता. अगदी लघुशंकेसाठी गाडीच्या खाली उतरता येणार नाही ही सूचना त्यांनी आम्हाला गाडीत बसण्याच्या अगोदरच दिलेली होती. त्यामुळे तो तसे वागूही देत नव्हता.
     जीवन म्हणजे काय व आनंद म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने जंगल अनुभवल्यानंतर व ते समजल्यानंतर आम्हाला कळाले.जंगलाची भाषा, जंगलाचे नियम हे सगळे वेगळे असतात त्यांनी त्यामध्ये मानवी हस्तक्षेप नसतो व तो करायचा पण नसतो हे आपल्याला पदोपदी जाणवते.थोड्याच वेळात धरणाचे बॅकवॉटर आम्हाला लागले आणि तिथे असंख्य प्राणी चरताना दिसले. अनेक प्राण्यांची मांदियाळी किंवा जत्राच मनानं याठिकाणी भरलेली होती तो संध्याकाळचा रम्य देखावा मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही ही निसर्गाची अनुभूती आम्हाला देवाने दिली असे म्हणावे का ?
        मधूनच कधीतरी आम्हाला जंगली कोंबडा ही दिसायचा खरेतर जंगली कोंबडा डौलदार,रुबाबदार जंगलामध्ये फिरताना मला त्यांचाही हेवा वाटला.सूर्यनारायण हळूहळू कलायला लागले आम्हाला ते जणू सांगत होते आता परत  फिरा कारण जंगलांमध्ये दिवसाचे व रात्रीचे नियम वेगळे नसतात जंगल हे जंगल असते, आणि म्हणून आम्ही आता ठरवले की आपण इथून काढता पाय घ्यावा.बंडू गाडी चालवायला असला की गाडीमध्ये निर्धास्त राहता येते शक्यतो तो गाडी चालवताना फारसा बोलत नाही त्याचा बहुतेक तो अलिखित नियमच असावा असे अनेक वर्षाच्या निरीक्षणावरून मला वाटते.नेहमीच आमच्याबरोबर असणारा मंगेश मात्र या ट्रीपला आमच्याबरोबर नव्हता त्याचा सहवास मात्र आम्ही चुकत होतो तो असता तर आणखी मजा आली असती आमचा गाईड आम्हाला सांगत होता की आपण  फिरलो ते फक्त जंगलाच्या एकूण भागापैकी 25 टक्के भागात फिरलो, इतर भागांमध्ये जायला बंदी आहे कारण त्या भागामध्ये वाघ व इतर हिंस्र प्राणी आहेत आणि तशी वनखात्याने बंद केल्यामुळे आम्हाला तिकडे इच्छा असूनही जाता येत नव्हते पण जंगलामध्ये जे बघितले ते ही काही कमी नव्हते.जंगलातील सांबर, नीलगाय, जंगली कोंबडा, अस्वल व असंख्य वानरे माकडे बघितल्यानंतर मनोमन लल्लुचे व देवाचे आभार मानले .
    बाहेर गेल्यानंतर आम्ही बहुतेक वेळा चिकन खातोच त्यादिवशी चिकन खाण्याची इच्छा झाली पण ऐनवेळेस ज्या ठिकाणी आम्ही मुक्कामाला थांबणार होतो त्यांनी रूम व जेवणाचे जास्त पैसे सांगितल्यामुळे आम्ही तिथून काढता पाय घेतला व वर्धा या ठिकाणी मुक्कामाला गेलो.             बोर अभयारण्य लोकेशन
   
    माझ्या मी सह्याद्री वेडा फेसबुक पेजवर जाण्यासाठी खालील लिंकचा वापर करा. मी सह्याद्री वेडा
        
       कसे जाल.

1) वर्धा पासून 40 किमी

 2) नागपूरपासून 65 किमी अंतरावर आहे. 

   श्री.अशोक राहिंज
 विद्या विकास मंदिर राजुरी
 तालुका जुन्नर जिल्हा पुणे

Friday, October 1, 2021

आडवाटेवरचे 'आडराई' जंगल.

आडवाटेवरचे 'आडराई' जंगल.
     आळेफाट्यावरून सकाळी साडेआठला निघून ओतूरला गरमागरम कांदा भजी व बटाटा भजीचा नाश्ता करून खुबी फाट्याच्या दिशेने गज ( हत्ती )  चालीने चाललो. कारण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहे हेच समजत नाही.  कधी आदळत, आपटत तर कधी खड्डे चुकवत पिंपळगाव जोगा धरणाचे स्वच्छ आणि निळेश्वर पाण्याचे विलोभनीय दृश्य बघत नागेश्वर मंदिराजवळ पोहोचलो. समोरच्या दलदलींमध्ये अनेक बगळे कीटकांवर ताव मारत होते तर गुराखी गाया चारण्यासाठी घेऊन चालले होते.
गाडीतून खाली उतरताच नागेश्वर मंदिराकडून मंजुळ अभंगाचे स्वर कानी आले
       
  वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |
पक्षीही सुस्वरे आळवीती ||

येणे सुखे रुचे एकांताचा वास |
नाही गुणदोष अंगा येत ||

आकाश मंडप पृथिवी आसन |
रमे तेथे मन क्रीडा करी ||
          खरोखरच तुकाराम महाराजांचा हा अभंग आणि सभोवतालचे वातावरण एकमेकास साजेसे होते. हरिश्चंद्रगडाच्या बाजूला प्रचंड दाट झाडी वर निळे आकाश आणि समोर शांत पण तेवढाच गुढ असणारा निळाशार जलाशय, स्वच्छ सूर्यप्रकाश, आणि मनाला  धुंद करणारे बेधुंद वातावरण यापेक्षा वेगळे काय हवे.
तुकाराम महाराजांचा अभंग हळूहळू पुढे सरकत होता आवाज कानी येत होता.
      
     कंथा कमंडलु देह उपचारा |
जाणवितो वारा अवसरु ||

हरिकथा भोजन परवडी विस्तार |
करुनि प्रकार सेवू रुचि ||

तुका म्हणे होय मनाशी संवाद |
आपुलाचि वाद आपणासी || 
 
खरोखरच या जुन्नर तालुक्याच्या सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा, घनदाट झाडी, अष्टविनायकापैकी दोन विनायक येथील सृष्टीसौंदर्य पाहूनच जुन्नर तालुक्यात विराजमान झाले असतील. 
खरोखरच जुन्नर तालुक्याचा पश्चिम पट्टा म्हणजे निसर्गसौंदर्याचे माहेरघर.

जुन्नर तालुका म्हणजे पर्यटनाची नवलाई, जुन्नर तालुका म्हणजे विविध प्रकारच्या खाद्यान्नाची मेजवानी, जुन्नर तालुका म्हणजे सह्याद्री वरदहस्त जुन्नर तालुका म्हणजे जैवविविधतेची अंकलीपी, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जुन्नर तालुका म्हणजे सह्याद्रीचा वाघ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी.
  जुन्नर तालुक्याला इतिहासाची जशी मोठी परंपरा आहेत तसाच जुन्नर तालुक्याचा भूगोल ही मोठा आहे. सातवाहन काळापासून नाणेघाट हा व्यापारासाठी प्रसिद्ध होता. त्या नाणेघाटाने
 जोडणाऱ्या दोन प्रदेशाची जागा आता जगप्रसिद्ध माळशेज घाटाने घेतलेली आहे.  एकाच तालुक्यात पाच धरणे असलेला तालुका आणि बरंच काही ऐतिहासिक आणि भौगोलिक.  आणि याच गोष्टींची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने पहिला पर्यटन तालुका म्हणून जुन्नरची घोषणा केली.
    हेमाडपंथी नागेश्वर मंदिर आपणास इतिहासाच्या पाऊलखुणा उलगडून दाखवते. अगदी दहाव्या शतकात पर्यंत शिलाहार वंशातील झंज नावाचा राजा या भागात राज्य करत होता त्याने गोदावरी ते भीमा या दरम्यानच्या  बारा नद्यांच्या उगमस्थाना जवळ शिवालये उभारली त्यातील एक नागेश्वर मंदिर.
येथील शिल्पकला आखीव, रेखीव असली तरी आता या मंदिरावर आणि मंदिराचा शिल्प कलेवर काळानेही आपल्या खुणा उमटवलेल्या आहेत.
या मंदिरातील महादेवाचे दर्शन घेऊन बाहेर येत असतानाच गावकऱ्यांनी महाप्रसाद घेण्याचा आग्रह केला. भात आमटी आणि बुंदी यांचा महाप्रसाद घेतला. मंदिरा पासूनच पाच मिनिटाच्या अंतरावर अपरिचित राजवाडा  लेण्या आहेत त्यावर सुंदर दगडी शिल्प कोरलेले आहे .शेजारी एक पाण्याची टाकी दिसते. या लेण्यांबद्दल फारशी माहिती मिळाली नाही.
लेण्या बघितल्यानंतर काळु धबधब्याकडे गेलो. सोनकीची फुले अधून-मधून आमचे स्वागत करत होती. तर काही खेकडे आमचं आवाज ऐकून गवतामध्ये लपत होती. मध्ये मध्ये डोंगरातून येणारे आडवे निर्झर आवाज करत आम्हाला साथ देत होते.

अडीच तीन किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर अगदी समोर गेल्यानंतर काळू धबधब्याचे  नयनरम्य दृश्य आपल्या दोन डोळ्यात साठवता येत नाही. काळू नदीवरील हा धबधबा हजार-बाराशे फूट तीन चार टप्प्यात पडतो. त्याचे फेसाळणारे शुभ्र रौद्र रूप बघायला शेकडो लोकांची झुंबड उडालेली होती. समोरून तटस्थ नजरेने उधळ्या व सिंदोळा किल्ला काळू धबधब्याकडे बघत असतो. काळू धबधबे जाच उजव्या बाजूला आणखीन एक मोठा धबधबा नागिन ज्या वेगाने पळते त्या वेगाने जमिनीकडे  झेपावत होता. हा  धबधबा या अगोदर तीन चार वेळेस बघितला होता.
 आज काळू धबधबा पुन्हा बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी मुद्दाम खास माझ्या मित्रांसाठी आलो होतो. माझ्या बरोबर माझे कॉलेजचे मित्र, पुणे येथील जेधे कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, लोणावळा येथील पुरंदरे कॉलेजचे प्रा.डॉ. लांडगे, मंचर कॉलेजचे प्रा. मारुती गुंजाळ आणि नगर कॉलेजचे प्रा. माधव रेवगडे, प्रा. गाडगे, प्रा. काळे आणि माझे नेहमीचे सहकारी हिरामण गोंदके होते.काळू धबधबा बघून  आम्ही सर्वच स्वर्गीय आनंद घेत होतो पण मला उत्सुकता होती ती
आडवळणाच्या आडराई जंगलात जाण्याची.
           काळू धबधब्याकडे पुन्हा एक एकटक बघत त्याचा निरोप घेतला आणि आमची मजल-दरमजल आडराईच्या जंगलाकडे सुरू झाली. थोडे पुढे गेल्यानंतर गायकवाड सरांनी थांबण्याचा इशारा दिला आता आपण परत मागे जाऊ,पुढे जायला नको असे ते म्हणत होते. जे जंगल बघण्यासाठी आलो ते अजून सुरूच झाले  नव्हते. जंगल बघितल्याशिवाय माघारी फिरायचे नाही असा आमचा हट्ट होता. मधल्या काळात सरांना कोरोणा झाल्यामुळे त्यांना शारीरिक थकवा जाणवत असावा. पण हळू जाऊ, आम्ही सर्व जण आहोत असा मानसिक धीर देत सरांना तयार केले. हळू हळू आडराईच्या जंगलाला सुरुवात झाली.
 आपल्याकडे जसे देवराईचे जंगल तसेच आडराईचे जंगल बहुतेक ते आडबाजूला असावे म्हणून त्याला आडराईचे जंगल म्हणत असावे. खरोखर मानवी स्पर्शापासून दूर असल्यामुळेच हे जंगल आजही सुरक्षित आणि सुस्थितीत आहे. जंगलातील पायवाटेच्या दोन्ही बाजूंनी गर्द झाडी, झाडीच्या एका बाजूला डोंगरकडा तर दुस-या बाजूला उंच उंच डोंगररांगा यातून मार्ग काढत,कधीतरी चिखलावरून घसरत एकमेकांना हात देत, साथ देत बरेच पुढे गेलो.

दोन्ही बाजूने उंच वाढलेल्या कारवीच्या कमानीतून पुढे जावे लागते. काही वेळ पायवाटेने चालल्यावर मध्येच आपणास भैरवाचे बन लागते तिथे भैरोबाची छोटी मूर्ती आहे त्यांचे दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ झालो. येथील जंगलात हिरडा, जांभूळ, चांदवा, बहावा, कुंभळ, गुलचावी, खारवेल, आवळी, बेहडा यांसारखे अनेक वृक्ष आढळतात.तर बिबळ्या, वाघ, जंगली मांजर, कोल्हा, तरस, भेकर, रानडुक्कर, मोर, मोठे घुबड, वानर, माकडे, शेकरू, सायाळ, सांबर, निलगाय, घोरपड पाहायला मिळतात. पण अधून मधून कोसळणाऱ्या सरीमुळे सर्व जंगल शांत होते.
 
     किर्र झाडीतुन, कारवीच्या झुडपातून येणारे कवडसे अचानक येणाऱ्या पावसाच्या सरी, त्यातून होणारा आवाज, वार्‍यामुळे  होणारी झाडांच्या पानाची सळसळ, मधेच येणारे दाट धुके, आपल्या भटकंतीला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. तेथील दगडांवर, खडकांवर आणि झाडांवर शैवालासारख्या वनस्पती उगवल्या आहेत, असे वाटते काही दिवस आपण थांबलो तर आपणही शैवालमय होऊन जाऊ.काळू धबधब्यापासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर गेल्यावर हरिश्चंद्रगडावरील तारामती शिखर आणि बालेकिल्ला दिसायला लागतो मी फोनच आपणास उंच डोंगरावर जुन्नर दरवाजाही दिसतो. येथील उंच उंच शिखरे बघितल्यानंतर उंच  मला वसंत बापट यांच्या काही ओळी आठवल्या.
भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा 
गौरीशंकर उभ्या जगाचा ,मनांत पूजिन रायगडा 
तुमच्या अमुच्या गंगा यमुना केवळ माझी भिंवरथडी 
प्यार मला हे कभिन्न कातळ , प्यार मला छाती निधडी 
      सततच्या पडणा-या पावसाने ओलेचिंब झालेले डोंगर अंग चोरून उभे असल्याचा भास होत होता, तर त्यावरून असंख्य वाहणारे छोटे छोटे ओहोळ त्या डोंगराला अंघोळ घालत होते. आणि त्या ओहळातून निर्माण होणारे धबधबे त्या शांत,सुंदर वातावरणाला साज चढवत होते. हे  विलोभनीय दृश्य कॅमेरात पकडण्यासाठी आमचा गाईड लक्ष्मण  तयार होता.
  तिथून पुढे गेल्यावर पाच मिनिटातच धबधब्यांची एक मालिका दिसली ते शुभ्र, फेसाळणारे, स्वच्छ पाणी बघितल्यानंतर कोणता ट्रेकर स्वतःला आवरू शकेल. आम्ही मागचा पुढचा विचार न करता त्या धबधब्याखाली स्वतःला झोकून दिले. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत, पाण्यात ढकलत आम्ही पुन्हा कॉलेज जीवन आठवले, लहानपण अनुभवले. लहान मुलांसारखी दंगामस्ती केली. आमचा मोठेपणा, आमचं पद, आमची प्रतिष्ठा, धबधब्याच्या पाण्याबरोबर काही काळ वाहून गेली.
     सगळे जग, भान, पद, प्रतिष्ठा विसरून जाण्याची जागा म्हणजे निसर्ग. तुम्ही एकदा निसर्गाचे झाला की निसर्गही तुमचाच होऊन जातो. मग हे उंच,उंच गिरीशिखरे आपणास साद घालतात. झाडांच्या फांद्यातून, पानातून वारा शिळ वाजवतो. धबधबेही आपल्यासाठी गात असतात. धुक्याची चादर आपल्या अंगावर केव्हा येते हे समजतही नाही. 
      परतीचा प्रवास पुन्हा त्याच पायवाटेने कधी झाडांच्या फांद्या धरून नागमोडी वळणे घेत घेत कारवीच्या जंगलातून चालतच असतानाच अचानक धोक्याच्या लाटेने वेढलो गेलो. काही वेळातच आकाशातून सहस्रावधी धारा धरेवर बरसायला लागल्या. किती हा निसर्ग अलौकिक, अद्भुत दुपारी निरभ्र असणाऱ्या आकाशात ढगांची दाटी झाली होती.अगदी पाच दहा मिनिटात पाणी पाणी झाले. पाऊस बरसायला लागल्यानंतर सह्याद्रीच्या ओड्यांना- नाल्यांना काही वेळातच प्रचंड पाणी येथे आणि या पाण्याला वेगही जास्त असतो. धुक्यामुळे दिशाही कळत नव्हत्या आमचा गाईड लक्ष्मण आमच्याबरोबर असल्यामुळे आमचा प्रवास सुखरूप निर्धोक झाला. दंडकारण्यात रामासाठी जी भूमिका लक्ष्मण निभावत होता तीच भूमिका आडराईच्या  जंगलात लक्ष्मण मेमाने आमच्यासाठी बजावत होता.
 लक्ष्मणच्या  घरी येता येता संध्याकाळ झाली स्वयंपाक तयारच होता. गरमागरम जेवणावर ताव मारून लक्ष्मणचा निरोप घेऊन घराकडे मार्गस्थ झालो.
आडराईचे जंगल अनुभवण्यासाठी सप्टेंबर ते डिसेंबर कालावधी उत्तम आहे.
श्री. लक्ष्मण मेमाणे हे खिरेश्वरलाच राहतात त्यामुळे या परिसराची चांगली माहिती आहे. ते उत्कृष्ट गाईड म्हणून काम करतात व त्यांच्या घरी जेवणाचीही सोय होऊ शकते.
संपर्कासाठी त्यांचा मोबाईल नंबर 9049161862
 कल्याण नगर रोड वरती मढ गावाजवळ त्यांचे चहाचे 'आमदार हॉटेल ' असून उत्कृष्ट चहासाठी प्रसिद्ध आहे.

          मी सह्याद्री वेड या माझ्या फेसबुक पेजला भेट देण्यासाठी खालील लिंक वर जा.


  खिरेश्वरची गूगल लोकेशन लिंक
          कसे जाल
 1) कल्याण वरून येताना खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे जाणे 90 कि.मी.
2) आळेफाटा पासून खिरेश्वर 45 कि.मी 
3) खुबी बस स्टॉप ते खिरेश्वर 6 कि.मी.

लेखकाच्या परवानगीशिवाय हा लेख किंवा यातील मजकूर प्रसिद्ध करण्यास मनाई आहे.

 श्री. अशोक राहिंज
 विद्या विकास मंदिर
 राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे.
   20.9.2021

Tuesday, September 28, 2021

दुर्लक्षित तुळजा लेणी.जुन्नर

जुन्नर तालुका म्हटले की डोळ्यासमोर येतात हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि शिवनेरी या पलिकडे जुन्नरची ऐतिहासिक ओळख म्हणजे भारतातील सर्वात जास्त लेण्यांचा समूह जुन्नर तालुक्याला लाभला आहे. माझे मित्र श्री.दत्तात्रय पोखरकर सर मी काहींना कामानिमित्त जुन्नरला गेलो होतो पण काम न झाल्यामुळे आमचा मोर्चा वळला तो तुळजा लेणीकडे.
  प्रवासात अंगावर अंतर शिंपावे तसा अधून मधून पाऊस उत्साह वाढवत होता.आजूबाजूचे वातावरण पावसाळ्यामध्ये आणखीनच खुलून येते. मोटर सायकलवर जुन्नरहून मोजून दहा पंधरा मिनिटात लेण्यांच्या पायथ्याशी पोहोचलो. लेणीकडे जात असताना लांबूनच या लेण्या  आपले लक्ष वेधून घेतात. लेण्यांपर्यंत जायला रस्ता सोपा असला तरी या ठिकाणी फारशी गर्दी आढळत नाही कारण ही लेणी लोकांना अजूनही फारशी माहिती नाही. लेणी चा नजारा बघितल्यानंतर ही लेणी आपल्या नजरेतून सुटली कशी याचे नवल वाटल्याशिवाय राहिले नाही.
           असं म्हणतात की महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी म्हणजे तुळजा लेणी, बऱ्यापैकी पडझड झाली असली तरी जे आहे ते पाहून समाधान नक्कीच होते. भारतीय पुरातत्व खात्याच्या कर्मचाऱ्यांमुळे साफसफाई व्यवस्थित आहे. येथील स्तूप बऱ्यापैकी खराब झाला आहे. मात्र  अष्टकोनी बारा खांब आपले लक्ष वेधून घेतात. वरती गोलाकार घुमट अजूनही सुव्यवस्थित आहे.   बौद्ध भिक्षू साठी कोरलेले विहार  बऱ्यापैकी सुव्यवस्थित आहे. मात्र लेण्याच्या दर्शनी भागाची बर्‍यापैकी पडझड झाली आहे. एक-दोन ठिकाणी अजूनही नक्षीकाम सुव्यवस्थित दिसते. पूर्वी गुराखी किंवा किंवा मेंढ्या चारणारे मेंढके लोक जनावरे चारत असताना रानामध्ये  गल (छोटा खड्डा) करून त्यामध्ये गोल गोटे खेळायचे.
 तशाच पद्धतीने काही गली (छोटे खड्डे) विहारामध्ये आपणास दिसतात. ही लेणी सम्राट अशोकाच्या काळामध्ये कोरलेली असावी असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे .एका भिंतीवर काही वाक्य लिहिलेले आहे पण ते आपणास समजत नाही. एका लेणीमध्ये तुळजाई देवीचे मंदिर आहे त्यामुळे बहुतेक या लेणीला तुळजा लेणी म्हणत असावे.
             जुन्नर पासून साधारण  तीन किलोमीटर अंतरावर तुळजा लेणी असून स्वतःच्या गाडीने तिथे जावे लागते. पावसाळा व हिवाळा जाण्यासाठी उत्तम कालावधी. चढण अतिशय सोपी आहे. 
तुळजा लेणीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर जा 
          श्री.अशोक राहिंज.
     विद्या विकास मंदिर राजुरी. तालुका जुन्नर जिल्हा पुणे.     

अंबिका व भुतलिंग लेण्यासाठी खालील लिंक माझ्या मी सह्याद्री वेडा फेसबुक पेजच्या लिंक वर जा.



          मी सह्याद्री वेडा

Thursday, September 23, 2021

🏇🏽🎠निसर्गाचे नवल 'सांदण दरी

🏇🏽🎠निसर्गाचे नवल  'सांदण दरी '🌄    सांदण दरी ला जायचं सांदण दरी ला जायचं असं  कितीतरी दिवसापासून चाललं हाेतं बऱ्याच वेळा ठरवलं पण वेगवेगळ्या कारणांमुळे जाणं झालं नाही. नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न या म्हणीची पुरेपूर प्रत्र.त्रचिती आली होती .
णयमलयाडलददझण घमक्षत्रत्रादत्रत्ररघहहैत्रय      या वर्षाची शिवजयंती सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये करायची व शिवरायांना अभिवादन करायचे असे ठरविले .सर्व मित्रांना अगोदरच्या दिवशी  फोन केले. शिवजयंतीच्या दिवशी सकाळीच आळेफाट्यवरून  सहा वाजता सांदण दरीकडे कूच करण्याची ठरले.वाऱ्याच्या वेगाने संगमनेरला निघालो, योगायोगाने वाटेतच आमचे मित्र प्राध्यापक जोंधळे सर यांची भेट झाली.  ते व सहकारी शिवज्योत घेऊन गावी चालले होते. गाडीतून खाली उतरून काही वेळ शिवज्योत घेऊन धावलो . शिवज्योत घेऊन निघणाऱ्या मावळ्यांना शुभेच्छा दिल्या व पुढे भंडारदऱ्याच्या  मार्गाला लागलो.

                                            संगमनेर वरून फोन करून घाटघरचा असणारा गुडनर कुंडलिकला अकोल्याला रस्त्यावरच थांबायला सांगितले त्याला घेऊन  राजूरला हलकाफुलका नाष्टा करून पुन्हा  भंडारदर्‍याच्या दिशेने आमचा घोडा उधळला. आम्हाला अमृतेश्वराचे दर्शन घ्यायचे असल्यामुळे आम्ही रतनगडाच्या बाजूने निघालो.
   सांदण दरिकडे जाताना एका प्रवासी गाडीचे शंभर व प्रत्येक व्यक्ती तीस रूपयाची पावती फाडावी लागते . भंडारदराच्या बॅकवॉटरच्या कडेकडेने  अमृतेश्वर ला पोचलो.

                             समोर पसरलेला अथांग महासागर उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेला आहे उत्तर नगर जिल्ह्याची भरभराट झाली ती याच धरणामुळे अमृतेश्वर हे अकराव्या बाराव्या शतकातले महादेवाचे मंदिर असून हेमाडपंथी धाटणीचे आहे उत्कृष्ट शिल्पकला जर बघायचे असेल तरी या मंदिराला भेट नक्कीच  द्यायलाच हवी.  भोलेनाथ चे दर्शन घेत असताना एक गोष्ट नवलाईची वाटली ती म्हणजे महादेवाच्या पिंडीसमोर दोन नंदी आहेत .आत्तापर्यंत जिथे जिथे गेलो तिथे प्रत्येक पिंडीसमोर एकच नंदी असतो येथे दोन नंदी का आहेत? याचे मात्र कोडे  मनाच्या कप्प्यात तसेच आहे.धरणाच्या कडेला असलेले अमृतेश्वराचे मंदिर,आजूबाजूला सह्याद्रीच्या उंच-उंच रांगा, जंगलातल्या वेगळ्या फळांचा फुलांचा,पानाचा सुगंध आपणास मोहित करतो.  येथील पुष्करणी अतिशय सुंदर, वेगळ्या धाटणीची तीही आवर्जून बघायला हवी. हा परिसर अतिशय रमणीय,पवित्र निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. मंदिराची जागा निवडणा-याला  मनोमन सलाम केला.  कारण देवांचा वास रमणीय,पवित्र ठिकाणीच असतो म्हणून त्यांनी या जागेची निवड केली असावी.  या जागेवरून पाय हलत नव्हता पण मनात ओढ होती ती सांधण .दरीची त्यामुळे तेथे जास्त न रेंगाळता आम्ही पुन्हा सांधण दरीच्या दिशेने मार्गस्थ झालो. 

                              आळ्याफाट्यापासून जवळजवळ दीडशे किलोमीटर असलेल्या सांम्रद गावाजवळ आमच्या  रथाचे सारथ्य करणारे संतोष गोपाळे सर  यांनी गाडी थांबवली. माकडासारखे उड्या मारून गाडीच्या बाहेर आलो समोरचे अलंग, कुलंग, मलंग सह्याद्रीचे पहारेकरी आमच्याकडे माना वर करून बघत होते, कुणी परका तर आला नाही ना,  मावळेच आले याची खात्री पटल्यानंतर पुन्हा ते निर्धास्त झाले. प्रत्येकाने पाठीवरती आपापली बॅग घेतली. बॅगमध्ये पाण्याची बाटली डोक्यावर हॅट, डोळ्याला गाँगल, पायात शूज, डोक्यात सांदण दरीबाबतची उत्सुकता, हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या नावाने आरोळी देत दरी कडे निघालो. गाडी पार्क केल्यापासून  अगदी दहा मिनिटातच सांदण दरीला सुरुवात झाली. हा ट्रेक आहे तो पूर्ण उतरण्याचा, कुठे चढाई करायला लागत नाही पण दरीत उतरणे सोपं नाही हे सांधण दरी अनुभवल्यानंतर कळते छोटे छोटे गोटे दगडांनी  गोट्यांनी सुरू होणारी सांधण दरी काही वेळातच प्रचंड आकाराचे  राक्षसी  दगड खडक  आपली वाट अडवायला उभीच असतात.आपण जसजसे पुढे जातो तसतसा या दरीचा अनुभव थरारक असतो .अंगावर काटे येतात काही ठिकाणी दोन दगडांच्या पोकळीतून आपणास हळूहळू पुढे सरकावे लागते ही दरी बघितलं तर मला गोविंदाग्रजांच्या काही ओळी आठवलया

मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा 

प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा 

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा 

नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा

अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा.
                  किती सार्थ वर्णन केले आहे  सह्याद्रीचे नवल म्हणजे सांदण दरी….. एका अतिप्राचीन  भौगोलिक प्रस्तरभंग रेषा म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच... .हजारो वर्ष सह्याद्रीच्या डोंगर रांगा वरून वाहाणाऱ्या पाण्यांनी ही दरी आणखीन रुंदावली आहे, कापली आहे. दरीच्या दोन्ही बाजूला काळा कातळ भिंती मनाचा थरकाप उडवतात काही दगड पडण्याच्या परिस्थितीत आहे. जशी मोठ मोठे दगड  आपली  वाट अडवतात तसे अनेक ठिकाणी पाण्यातून पुढे जावे लागते नवीन माणसाला पाण्याचा अंदाज येत नाही . त्यामुळे हळूच एक पाय पाण्यात टाकला मग दुसरा मग तिसरा  भीती, नवल, आश्चर्य ,उत्सुकता सगळ्या गोष्टी एकाच वेळेस मी अनुभवत होतो पाण्यात चालता चालता अचानक छातीपर्यंत पाणी लागले अर्थात मागून काही मित्र धीर देत होते  पण आम्ही कधी हातात हात घेत, एकमेकांना धीर देत  पाण्याला पार करून गेलो. पाणी इतके थंड होते की मला माझ्या काश्मीरच्या प्रवासाची आठवण झाली. त्यावेळेस नद्या पार करताना प्रचंड थंड पाणी असायचे मला तर वाटले जास्त वेळ आपण पाण्यात राहिलो तर आपले पाय बधिर होईल मी पुढे गेल्यानंतर हळूहळू सुनिल पवार, अंगद उदमले  ,किरण औटी, हिरामण गोंदके यांची फौज पुढे आली  पण आमचे सारथ्य करणारे संतोष गोपाळे ,शंकर पवार, सिद्धू पवार हे मात्र मागेच थांबले बरोबर 12 वाजता आम्ही निम्मी सांदण दरी पार केली होती सांधण दरी म्हणजे उन सावल्यांचा खेळ. दोन्ही बाजू उंच असल्यामुळे सूर्यप्रकाश  लवकर येत नाही आला तरी लख्ख प्रकाश पडत नाही  हे दृश्य अतिशय सुंदर विलोभनीय अद्भुत आहे याचा अनुभव आपण घ्यायलाच हवा.  दरीत हवा बाहेर पेक्षा खूपच थंड असते.

                               सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळणे इतकं सोपं नाही आपण जसेजसे पुढे जातो तसतशी दोन्ही कडच्या भिंतींची उंची वाढत जाते काही ठिकाणी  हे भिंतीकडे दीडशे फुटापर्यंत आहे राकट .  कणखर सह्याद्री . . . आसमंताला भिडलेल्या उंचच उंच शिखरांचा सह्याद्री . . खोलच खोल द-या- खो-यांचा सह्याद्री,काळजाचा ठोका चुकविणान्या कोकणकडांचा सह्याद्री, . .हिमालयाची पाठराखण करणारा सह्याद्री, निसर्गसंपत्तीने नटलेला सह्याद्री, शिवरायांसारख्या वाघाला जन्म देणारा सह्याद्री. .किती किती सह्याद्रीची रुपये आपणास दिसतात .अर्थात नटलेला सह्याद्री बघायचा असेल तर  पावसाळ्यात जायला हवे अर्थात तुम्ही पावसात आले तर तुम्हाला सांधण दरी मध्ये उतरता येणार नाही कारण प्रचंड पाण्याचा दाब,घोंगावत येणारे पाणी त्याचे ते रौद्र रूप बघितल्यानंतर सह्याद्रीच्या पाण्याबरोबर दोन हात कोण करेल?  म्हणून ज्याला सांधण दरी वरून बघायची व निसर्गसौंदर्य लांबून अनुभवायचे बघायचे त्याने पावसाळात जायला हवे ; पण सांदण दरीच्या आत जायचे असेल तर डिसेंबर ते मार्च या कालावधीत गेल्यास तुम्हाला दरीमध्ये उतरून शेवटपर्यंत जाता येते .पाण्याला पार करत असतांना आम्ही शूज काढून ठेवल्यामुळे औटी किरण व मी अनवाणी पायानेच सांधण दरी पार केली हजार वर्ष या दरीतून पाणी वाहिल्यामुळे  दगडे एकमेकाला घासून  बर्‍यापैकी गोल गोल झाले आहेत आणि या वरुन चालताना काळजी घ्यावी लागते .काही ठिकाणी कपारीला घोरपडी सारखी बोटे रोवून भिंतीला आलिंगन देऊन एकेक पाय टाकून आपणास हळूहळू कासवासारखे पुढे सरकावे लागते. अजूनही दरी खूप पुढे होती पण खाली जायचं असेल तर या रॅपलिंग करावे लागते. ते साहित्य आमच्याकडे नसल्यामुळे व पोटात कावळे ओरडायला लागल्यामुळे घाटघरला जाण्याचा निर्णय घेतला. आमच्या बरोबर असलेल्या कुंडलीकला आम्ही आधीच जेवण बनवायला सांगितले होते. वाढण्याची तयारी होत असतानाच संतोष गोपाळे सर पेंगायला लागले इतक्या गर्दीत गडबडीत आवाजात त्यांना पेंगायला कशी येते हा प्रश्न माझ्यापुढे नेहमीच असतो.

        काही वेळाने गावाला चक्कर मारून आलो. अतिशय सुनियोजित असे नवे घाटघर गाव शासनाने वसवले आहे.फिरून येईपर्यंत जेवणाची ताटे तयार झाली होती. चिकन भाकरीवरती येथेच्छ ताव मारून गावाला वळसा घालून घाटण देवीचे दर्शन घेतले.येथे अहमदनगर जिल्हा संपतो व ठाणे जिल्हा सुरू होतो. समोरच अलंग मलंग कुलंग किल्ले आम्हास बोलावत होते, खुणावत तिथूनच त्यांना हात जोडले व परतीचा प्रवास सुरू केला आता मात्र  आम्ही ज्या बाजूने आलो त्याच्याविरुद्ध बाजूकडून म्हणजे कळसुबाईच्या बाजूकडे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आम्हाला साद घालत होते. पण एव्हाना खूपच संध्याकाळ झाली होती पुन्हा परिसर पायाखाली घालण्यासाठी सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळण्यासाठी आम्ही येणार होतो कळसुबाई कडे पाहत मला गीत आठवले भव्य हिमालय तुमचाअमुचा, केवळ माझा सह्यकडा

गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा 

तुमच्याअमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिवरथडी 

प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी 

मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला 

ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला 

धिक तुमचे स्वर्गहि साती 

इथली चुंबिन मी माती                                   

           # कसे जाल #  



1) पुण्यापासून आळेफाटा ,ओतुर ,ब्राह्मणवाडा, कोतुळ, भंडारदर्यामार्गे 194 किमी.

2) नाशिक वरून घोटीमार्गे 92 किमी आहे 

3) मुंबई ठाणे,आसनगाव ,इगतपुरी मार्गे 185 किमी  सांदण दरी आहे .

भंडारदरा जवळ असलेल्या शेंडी  मध्ये उत्कृष्ट प्रकारचे हॉटेल असून तेथे आपणास मुक्काम करता येतो . या शिवाय  सांदण दरीच्या शेजारी असलेल्या सांम्रद गावीही घरगुती जेवणाची व मुक्कामाची स्थानिक लोकांकडे सोय होऊ शकते.🙏🏻🙏🏻🌹19 .2.2019🙏🏻🙏🏻

  श्री. अशोक राहिंज.              
विद्या विकास मंदिर राजुरी . 
तालुका जुन्नर जिल्हा पुणे

लालपरी पळली पाहिजे.

पूर्वी गावांमधील लालपरी म्हणजेच एसटी यायची तेव्हा तिच्या स्वागतासाठी आबालवृद्ध हजर असायचे. आपल्या गावांमध्ये एसटी येते याचा त्यांना अभिमान  ...