विनोबा भावे .
पवनार आश्रम वर्धा.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणीचे बोर अभयारण्यातील सफारी हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रसंग होता. ते अभयारण्य बघून आम्ही संध्याकाळी 7.30 पवनार आश्रमात पोहचलो नागपूर पासून पंच्याहत्तर किलोमीटर व आनंदवन पासूनही 70 किलोमीटर वर्धा हे जिल्ह्याचे ठिकाण असून रेल्वेमार्गानेही जोडले आहेत. रस्ते व रेल्वेच्या माध्यमातून आपणास पवनार आश्रमात जाता येते .
धाम नदीच्या कडेला वसलेला आश्रम वर्धा शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असून आता वर्धा शहर आणि पवणार आश्रम जवळ जवळ एकमेकांना जोडले गेले आहेत.
. वर्धा शहरातील पवनार आश्रम सेवाग्राम आश्रमाला भेट देणे हे माझ्या आयुष्यातील एक स्वप्न होतं. माझ्या बरोबर असलेले माझे मित्र श्री.संतोष गोपाळे व श्री किरण औटी, श्री सुनिल पवार यांना ही पवनार आश्रमाबद्दल कुतूहल होते. आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात साकार होत होते. महात्मा गांधींचे पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणजे विनोबा भावे,जगाला अंगाई देणारे विनोबा भावे ,भूदान चळवळीच्या माध्यमातून 47 लाख एकर जमीन भूमिहीनांना मोफत वाटणारे विनोबाभावे, महात्मा गांधींचा कितीतरी वर्ष सहवास लावणारे विनोबा भावे ,एकाच माणसाची किती वेगवेगळी रूपे ! त्यांच्या आश्रमात पाऊल टाकले, तेथील माती कपाळी लावली एका कोपऱ्यात चपला काढून आम्ही सर्व मित्र शांतपणे आश्रम बघत होतो. श्री. गंगाधर सहाणे,श्री अंगद उदमले तेथील एक सेविकेकडून माहिती घेत होते. तेथील सेवीकाही आम्हाला विनोबा भावे आणि त्यांचा जीवनपट उलगडून सांगत होत्या. ते ऐकून मन भारावून आले विनोबा भावे यांचे मत होते की , प्रत्येक माणसाने जगण्यासाठी काहीतरी काम करायला हवे.ते स्वतःही शेतामध्ये अंगमेहनतीचे काम करायचे व आपल्या सहकाऱ्यांना सुद्धा शेतामध्ये काम करायला लावायचे. पंधरा एकर मध्ये पसरलेला आश्रम ध्यानस्थ बसलेल्या साधू सारखा शांत व पवित्र वाटतो. कुठलाही गोंगाट नाही फारशी धावपळ नाही,लगबग नाही सर्व कसे शांत,शांत. या शांतीचा नकळत परिणाम आमच्या मनावर झाला व आम्ही शांतपणे काही काळ त्या ठिकाणी ध्यानस्थ झालो . . विनोबा भावेंनी 1937 ला आश्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली ज्या वेळेस आश्रमाला सुरुवात केली त्यावेळेस पाया भरण्याच्या वेळेस त्यांना या ठिकाणी जुन्या काळातील काही मूर्ती सापडल्या आहेत त्या आजही आपणास बघता येतात. त्या मूर्तींचे दर्शन घेऊन आम्ही विनोबा भावे ज्या खोलीमध्ये राहत होते ती खोली बघितली. अतिशय छान,अतिशय साधी तेवढीच निर्मळ, ती नुसती खोली नसून ते एक मानवतेचे मंदीर आहे. या मानवतेच्या मंदिरामध्ये मानवतेचा महापुजारी काही काळ राहिला स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले ती वास्तू ती जागा ते वातावरण किती प्रसन्न असेल त्या वास्तूत वातावरणात काही काळ आम्हाला घालवता आला. आम्ही विनोबा भावे यांच्या समाधीपुढे नतमस्तक झालो समाधी वरती अंगाई व हरी हे शब्द लिहिलेले होते. जगामध्ये एवढी मोठी माणसं किती साध्या पणाने आयुष्य जगली ती स्वतःसाठी जगलीच नाही ती जगली तुमच्या आमच्यासाठी, आखिल मानव जातीसाठी. . . हा आश्रम खास महिलांसाठी आहे.आजही महिला आश्रमात वास्तव्य करून राहतात. महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या आश्रम आहे. कुणी मालक नाही कुणी सेवक नाही आजही इतक्या सेविका स्वतः शेतामध्ये कष्ट करतात. आचार्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करतात विनोबा भावेंनी भूदानाची चळवळ 1951 मध्ये सुरू केली संपूर्ण भारतभर पायी फिरले पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतरही ते पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेशमध्ये गेले व तेथे त्यांनी भूदान मागितले. भूदानमध्ये मागितली 47 लाख एकर जमीन जवळजवळ आठ लाख भूमिहीन शेतकऱ्यांना त्यांनी वाटली. असा हा मानवतेच्या महामानवला वंदन करण्यासाठी आपण सर्वांनी पवनार आश्रमाला भेट द्यायलाच हवी.
घड्याळाचा काटा शांतपणे हळू पुढे पुढे सरकत होता. वेळेची जाणीव करून देत होता. आश्रमाची भेट देण्याची वेळ संपली होती म्हणून जड अंतकरणाने आश्रमाचा निरोप घेतला. श्री.राहिंज अशोक विद्या विकास मंदिर राजुरी ता.जुन्नर जि पुणे
8 .1.2019
महाराष्ट्राचे महात्मा गांधी अर्थात विनोबा भावेच्या इतिहासाची ओळख करून दिली त्याबद्दल धन्यवाद व असेच भावस्पर्शी प्रवास वर्णन लिहीत जा खूप खूप शुभेच्छा!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसरजी आपले नाव नाही कळाले
ReplyDelete