अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुका म्हणजे निसर्ग सौंदर्याचा अद्भुत,अप्रतीम, आविष्कार ,महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, पर्यटकांच्या मनावर राज्य करणारा रंधा फॉल, अम्ब्रेला फॉल ,गोदावरी नदीची उपनदी प्रवरेचा उगम, उत्तर नगर जिल्ह्याची तहान भागवणारा भंडारदरा, धाडस ,उत्साह, जोश,उत्कंठा आणि मनाला धडकी भरवणारी सांम्रदची सांदण दरी आणि पर्यटकांची पंढरी म्हणजे हरिश्चंद्रगड आणि असंख्य डोंगररांगा आणि त्यावर वसलेले किल्ले, भन्नाट रानवारा, फुलांचे गालिचे, वाऱ्यालाही धडकी भरवणारा कोकणकडा, आणि शिखरावर फुटणार तांबडं अनुभवायाचे असेल तर पायाला भिंगरी बांधून आणि सह्याद्रीच्या रानवाटा तुडवायला हव्या इंग्रजांच्या काळापासून प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे फोफसंडी.
बाहेरच्या मानवी हस्तक्षेपापासून बर्यापैकी दूर असलेलं, पर्यटकांच्या दृष्टीने अस्पर्शित असलेले ठिकाण आणि अजूनही गावपण टिकून ठेवलेलं गाव म्हणजे फोफसंडी गाव. गावची लोकसंख्या 1200 च्या दरम्यान आहे.या गावात 2010 साली प्रथम बस आली यावरून गावच्या प्रगतीची व दळणवळणाची कल्पना येते वैद्यकीय सुविधासाठी 20 किमी अंतरावरील कोतूळला जावे लाग
एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला कुंजरगड (कोंबडगड) दुसऱ्या बाजूला मांडवी नदीचे उगम स्थान यांच्या मध्यावर वसलेलं फोफसंडी गाव .सगळ्या बाजूंनी उंच ,उंच शिखरे पर्वतांनी वेढलेलं, वनश्रीने नटलेलं हे गाव मांडवी नदीच्या तीरावर वसलेलं आणि अलीकडच्या काळात थोडसं पर्यटनाच्या दृष्टीने प्रकाशझोतात आलेलं. फोफसंडी गाव एकदा बघायला हवं इतर ठिकाणांपेक्षा उशिरा सूर्य दिसतो आणि मावळतोही लवकर. बशीसारखा खोलगट आकार या भागाला प्राप्त झालेला आहे.
अनेक इंग्रज अधिकारी स्वच्छंदी, धाडसी आणि नाविण्याचा शोध घेणारे, असिच जंगलात लुप्त झालेली अजिंठा लेणी जगाला परत इंग्रजांनी दाखविली. पॉप नावाचा इंग्रज अधिकारी घोड्यावर फिरत या भागात आला त्याला हे ठिकाण आवडले व तो दर रविवारी म्हणजे संडेला या ठिकाणी यायचा त्यावरून या गावाला पॉप संडे व नंतर कालौघात नाव बदलून फोफसंडी पडले असावे असे स्थानिक रहिवासी दत्तात्रय मुठे यांनी सांगितले
खरंतर या गावांमध्ये विशेष असं काही नाही आणि म्हणाल तर सर्वच विशेष शुभ्रफेसाळणारे धबधबे, दाट हिरवाईने नटलेला परिसर,किर्र झाडी, खळखळणारी अल्लड मांडवी नदी,धुक्याची चादर, ढगांची लीला, रान भाज्या, औषधी वनस्पती, जंगली मेवा, रंगीबेरंगी जंगली फुले ती सर्वच आपल्याला फोफसंडी आणि आजूबाजूला बघायला मिळतात शुद्ध, निर्मळ ,ताजी हवा असं बरंच काही.
शीतल तनु चपल चरण अनिल गण.
मांडवी नदीचा खळखळणारा प्रवाह आपलं मन मोहून टाकतो पूर्वीच्या काळी मांडव्यगण ऋषीने या ठिकाणी तपश्चर्या केली आणि त्यावरून या नदीला नाव पडले मांडवी नदी. खरोखरच तपस्वींनी तपश्चर्या करावी असा हा निरव शांततेचा परिसर आपणासही आबोल करतो. ही नदी नागमोडी वळणे घेत पुढेपुढे सरकते. आळोखे पिळोखे देत तर कधी घोड्याच्या नालासारखा सारखा आकार घेत,केव्हा अल्लड मुलांसारखी उड्या मारणारी नदी अनेक आदिवासी लोकांच्या जीवनात चैतन्य आणते.अनेक छोटे मोठे बंधारे बांधून आदिवासीने आपले जीवन आणि शेती फुलविली आहे
फोपसंडी वरून येताना जाताना ठिकाणी लाल मातीत भाताची पिके डोलतांना सळसळताना दिसतात.भात शेतीचा,रानफुलांचा ,लतावेलींचा रानगंध दरवळत राहतो. एखाद्या सुंदर घरापुढे रांगोळी काढावी तशी खुरसणीची शेती, त्यावर फुललेली पिवळी फुले, फुलांनी बांधाच्या कडेला रांगोळी घातलेली भासते. ही रंगीबेरंगी फुले शेतातच नव्हे तर मनाचेही सौंदर्य वाढवतात नाचणीचीही शेती अधूनमधून आपले लक्ष वेधून घेते.
फोफसंडी गावातून कुंजीर गडाकडे जाताना एका टेकडीवर आपणास गुहेत राहणारे कुटुंब भेटते. साठ-सत्तर वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून याच गुहेत पंचवीस-तीस जनावरांसह राहतात. कुंजीर गडावरती बघायला फारसे काही नसले तरी ट्रेकिंगसाठी हा किल्ला खूपच छान आहे. किल्ल्यावरती पाण्याच्या अनेक टाक्या आहेत. किल्ल्यावरती जाताना एक गुहा लागते त्या गुहेतून पुढे एक माणूस सरपटत जाईल असे छिद्र लागते. त्यातून आपणास किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूकडे निघता येते. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन अडीच तास लागतात. पण हा ट्रेक निसर्गाशी जवळीक साधतोच पण एक नवीन अनुभूती देतो.
दरीत वसलेले कोपरे जवळील मांडवे गाव
निसर्गाचा वरदहस्त या परिसरावर झाला असला तरी सरकारचा वरदहस्त मात्र अजूनही या भागामध्ये फारसा झालेला दिसत नाही. ऐतिहासिक पॉप इंग्रज अधिकार्याचे घराने इतिहास खुणावत असला तरी आपल्या दृष्टिस पडतो तो भिंतीचा सांगाडा. येथेच एक निरीक्षणासाठी उंच मनोरा असून त्यावरून आपणास अप्रतिम निसर्ग नजरेच्या कवेत घेता येतो. गावातील रहिवासी दत्तात्रेय मुठे यांच्याशी बोलताना जाणवले की सरकारने पर्यटनाच्या दृष्टीने येथे अजून काही उपाय केले नाही. त्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला पण यश आले नाही.जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाला तसाच अकोले तालुका पर्यटन क्षेत्र घोषित झाला तर भविष्य काळामध्ये या भागाचा विकास नक्कीच होईल व पर्यटनाला नविन चालना मिळेल. त्यानी पर्यटकांसाठी येथे जेवणाची व राहाण्याची सोय केली आहे. श्री.दत्तात्रय 'हनुमंता मुठे' यांचे सह्याद्री दर्शन पथिकालय आहे. +919022470199 या नंबर वर संपर्क करावा.
फोफसंडीला पर्यटनाच्या नकाशावर आणणारे श्री.दत्तात्रेय मुठे..
आळेफाटा पासून उदापूर मार्गे आपणास फोफसंडी ला जाता येते. हे अंतर 60 किलोमीटर असून आजूबाजूचा निसर्ग अतिशय देखणा आहे. मुंबई फोफसंडी हे अंतर 182 किमी असून आपणास चारचाकीने प्रवास करता येतो. पुणे ते फुरसुंगी 138 कि.मी नाशिक वरून संगमनेर मार्गे कोतुळ असे अंतर 123 कि मी आहे. आपल्या खाजगी गाडीने या ठिकाणी जाणे फायदेशीर आहे.
🙏🏻✍🏻✍🏻अशोक राहिंज🙏🏻, Bachelor Of Journalism, विद्या विकास मंदिर राजुरी. तालुका जुन्नर जिल्हा पुणे, दि .10.7.2021
Khup chhan mahiti
ReplyDelete👌👌
ReplyDeleteVery good and useful information Sir.
ReplyDeleteसर खुप सुंदर😍💓 लेख आहे👌👌👌
ReplyDeleteसर खूप सुंदर माहिती व अप्रतिम मांडणी आणि योग्य अशा प्रतिमांची योजना, सलाम
ReplyDelete