Friday, September 3, 2021

कोविड -19 नंतर भारतासमोरील आव्हाने आणि उपाय. 'मी सह्याद्री वेडा.'

कोविड -19 नंतर भारतासमोरील आव्हाने आणि उपाय.
   हा लेख विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर लिहिलेला आहे.आपणासइतर काही आव्हाने किंवा उपाय असल्यास सुचवायला हरकत नाही.

'आले चहु दिशांनी तुफान विस्मृतीचे
नाती जपून ठेवा अंधार फार झाला.'
 खरोखरच आज अशी भीषण परिस्थिती जगापुढे आणि भारतापुढे निर्माण झाली आहे covid-19 ने समस्याच नव्हे तर समस्यांची मालिकाच मानवी जीवनामध्ये सुरू केली आहे. एका समस्येवर मात केली तर दुसरी समस्या आ वासून आपल्यापुढे उभे आहे. मनी धनी नसतांना अचानक घोंगावत वादळ यावं आणि डोळ्यासमोर उद्ध्वस्त करून जाऊ अशीच परिस्थिती आज कोरणा महामारी मुळे निर्माण झाली आहे. गावातून शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या लोकांना काही ठिकाणी तर गाव बंदी केली आहे भाऊ भावाला घरामध्ये घ्यायला तयार नाही. आज पर्यंत हक्काने एकमेकांना घरी बोलणारी माणसं समोर माणूस दिसला की दार बंद करतो आहे. एक वेळेस दार बंद केली तरी चालेल पण मनाचे दरवाजे बंद झाले तर हे जगातील माणुसकी कायमची संपून जाईल.
भारतामध्ये आर्थिक विषमता तर पहिल्यापासून आहे पुन्हा covid-19 मुळे गरीब-श्रीमंत ही दरी आणखीनच रुंदावली चालले आहे. अनेक लोकांचा रोजगार हिरावला आहे. मनगटात दम आहे, ताकत आहे पण त्या हाताला काम नाही. जगण्यासाठी लाचार होण्याची वेळ covid-19 ने सर्व मानव जातीवर आणली आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतामधला माल आहे तसा सोडून दिला. गुंतवलेले भांडवलही  मिळाले नाही तर तो शेतकरी कसा उभा राहणार. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी खऱ्या अर्थाने मातीमोल झाला. ज्या मातीमध्ये सोने पिकविण्याची धमक आणि ताकद त्यांच्यामध्ये होती तोच मातीमोल झाल्यानंतर त्याला सावरणार कोण ?उभारी देणार कोण.? छोटे छोटे दुकानदार व्यापारी केव्हाच रस्त्यावर आले आहे. ज्या बँकांकडून कर्ज घेऊन दुकानांमध्ये माल भरला आहे त्यांचे हप्ते कसे द्यायचे आणि मुलांना दोन घास कसे खाऊ घालायचे हा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे.
        
यातच काही लोकांनी संधी साधली आहे. आपल्याकडे जो माल शिल्लक आहे तो अव्वाच्या सव्वा किमतीला विकून नफेखोरी करत आहे. तर काही ठिकाणी काळाबाजार आला ऊत आला आहे.
   
जनसेवा हीच ईश्वरसेवा असे समजणारे काही डॉक्टर कसायांच्या पेक्षा निर्दय ठरत आहे. सामान्य जनतेला जेवढं लुटता येईल, ओरबडता येईल येईल तेवढं लुटण्याचे काम ही मंडळी करत आहे. आज हॉस्पिटल म्हणजे लुटारू केंद्र होत आहे.
        

आणि सगळ्यात भयानक परिणाम म्हणजे छोटी छोटी चिमणी पाखरे शाळेला पोरकी झाली आहे. शिक्षकांची आणि मुलांची भेट नाही. आणि ऑनलाइन लेक्चर हा त्यावरचा पर्याय नाही. मुलांबरोबरच पालकांची मानसिकता बिघडली आहे. काल परवाच बातमी वाचली की मुलगी अभ्यास करत नाही म्हणून आईने तिची हत्या केली तर दुसरी बातमी होती की आई सारखी अभ्यास कर म्हणते म्हणून मुलींनेच आईची हत्या केली. हा कोरोणा अजून काय करणार रे देवा... !
आपल्याकडे एक म्हण आहे दुरून डोंगर साजरे नवरा-बायको जास्त काळ घरांमध्ये एकत्र राहिल्याने अनेक घरांमध्ये भांडणाचे, घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. घरामध्ये चिडचिड वाढली आहे. मोबाईल कोणाकडे असावा,? टीव्हीचा रिमोट कोणाकडे असा असावा.? अशा साध्या साध्या गोष्टींवरुनही घरामध्ये वाद होतो आहे.
      

अनेक लोकांचे रोजगार गेले. त्यामुळे गुंडगिरी, लुटमार यांचे प्रमाण वाढले आहे. शेवटी जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला की माणूस सर्व तत्व सोडून देतो. हे कोरोणाने  सिद्ध केले आहे. म्हणतात ना बळी तो कान पिळी अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.
 घराचीच नव्हे तर देशाची ही अर्थव्यवस्था बिघडली आहे. सरकारला अनेक कंपन्यांचे खासगीकरण करावे लागले. अनेक प्रकल्प रद्द करावे लागले. कर्मचाऱ्यांचा पगार देता देता सरकारला नाकी नऊ आले. पोरं म्हणावा तसा महसूल सरकारकडेही जमा होत नाही.
            
असा सगळीकडे अंधार दाटलेला असताना सूर्य ढगाच्या आड लपावा आणि अचानक ढगामधूनच सूर्याची सोनेरी किरणे यावी आणि लख्ख प्रकाश पडावा. तशी परिस्थिती काही ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दिसत आहे.
  
काही छोट्या छोट्या व्यवसायिकांनी, कंपन्यांनी कोरोना ही इष्टापत्ती  समजून नवीन संधी निर्माण केली आहे. आपल्याकडे प्रथम जेव्हा कोरोना आला त्या काळामध्ये सगळ्याच वस्तू आपल्याला आयात करावे लागत. आज त्याच वस्तू आपण जगामध्ये निर्यात करत आहोत. सॅनिटायझर, मास्क, पिपीई किट याबाबतीत भारताची मक्तेदारी निर्माण होऊ पाहते आहे.
             
अनेक लोकांना समजून चुकले की पैसा महत्वाचा नाही. या काळामध्ये अनेक ठिकाणी माणसे ओळख कळत नसतानाही धावून गेली मैत्रीचा, माणुसकीचा नवा सेतू निर्माण झाला. माणसाला माणसाची किंमत कळाली.
        
ज्ञान प्रचंड वेगाने पसरते आहे. ज्ञानाच्या कक्षाही रुंदावल्या आहेत. वर्गामध्ये जाऊन शिकण्याच्या संकल्पना कोरोनाच्या काळामध्ये बदलल्या आहेत. वर्ग गणित शिक्षणाची नवीन संकल्पना रुजू होण्याची शक्यता आहे. असे झाले तर घर बसल्या आणि ज्ञान मिळविण्याचा आणि डिग्री मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. प्रवासात जाण्यायेण्याचा वेळ वाचेल, प्रदूषण कमी होईल. रोडवरची गर्दी आपोआप कमी होईल. 
    
अनेक वर्षापासून आपल्याकडे ऑनलाइन व्यवसाय, ऑनलाइन मार्केटिंग चालू आहे कोरोणाच्या काळामध्ये अनेकांना नवीन रोजगार निर्माण झाला. कोरोणा महामारी ही संधी समजून  कोरोणाच्या काळामध्येही अनेक तरुण यशस्वी झाले आहे. कोणते संकट जेव्हा येते तेव्हा त्यामागे संधी दडलेली असते अनेक लोकांनी सिद्ध करून दाखवले आहे.
कोरोणा महामारीच्या काळामध्ये भारतीय शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना नवीन बाजारपेठ सापडली आहे, आणि जगाच्या अनेक देशांमध्ये भारतीय माल, भारतीय वस्तू जाऊन पोहोचल्या आहेत.
 
अनेक कंपन्यांनी आपले ऑफिस बंद केले पण नंतरच्या कालावधीमध्ये अनेकांनी Work From Home ही संकल्पना राबवत आपल्या कंपन्या यशस्वी  चालू ठेवल्या. शेवटी परिस्थितीच माणसाला कसे जगायचे हे शिकविते परिस्थितीपुढे माघार घेईल तो माणूस कसला?   
  
कोरोना महामारी मी काही काळ माणसाला माणसापासून दूर ठेवले, पण माणसाची आणि माणुसकीची किंमतही कोरोणा मुळेच आपणास समजली . माणुसकीचे नवे नाते निर्माण झाले. ओळखपाळख नसतानाही अनेक लोकांनी रक्तदान, अन्नदान केले. अनेक ठिकाणी मोफत जेवण,मोफत प्रवास,मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात आली.
 
Covid-19 हे संकट न मानता यापासून शिकण्यासारखे अनेक गोष्टी आहेत आपली आरोग्य यंत्रणा किती ऑक्सिजन वर आहे एक covid-19 ने दाखवून दिले आहे म्हणून प्रथमता आरोग्य यंत्रणा सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे. भविष्य काळामध्ये अशी संकट निर्माण झाल्यानंतर हजार लोकांना एकाच ठिकाणी उपचार कसे करता येईल यावर सरकारने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.  
     
संसर्गजन्य आजार आल्यावर कसे वागावे याचे शिक्षण पुस्तकातून देणे गरजेचे आहे. देशाचे सुजाण नागरिक म्हणून अशा काळात आपले कर्तव्य कोणते याची जाणीव निर्माण व्हायला हवी. 
युद्धाच्या वेळेस जशी आपल्याकडे राखीव फौज असते तशी संसर्गजन्य आजारात राखीव डॉक्टर, रिटायर डॉक्टर, परिचारिका,  तया र ठेवता येतील का यांची सेवा घेता येईल का? हे ही सरकारने बघणे गरजेचे आहे. 
    
अनेक ठिकाणी औषधांचा लसींचा काळाबाजार झाला ही रोखण्यासाठी सरकारकडे पुरेशे मनुष्यबळ नव्हते. औषधांचा साठा ही पुरेसा नव्हता त्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. भविष्य काळामध्ये या गोष्टींना तोंड कसे देता येईल याची कार्यवाही सरकारने आत्तापासूनच करायला हवी. 
 
अन्न वस्त्र निवारा या ज्या आपण मानवाच्या मूलभूत गरजा म्हणतो त्याच पद्धतीने आरोग्य ही सुद्धा मुलभूत गरज आहे हे समजून सरकारने सर्वांना मोफत आरोग्य सेवा द्यायला हवी. अशा महामारीच्या कालावधीमध्ये सर्व खाजगी डॉक्टरांच्या सेवा या सरकारने आपल्या नियंत्रणाखाली आणायला हव्यात. 
         
कोणत्या देशाला मजबूत बनवते ते परकीय चलन महामारीच्या काळामध्ये परकी चलन मंदावते यासाठी सरकारने टास्क फोर्सची स्थापना करुन व्यापार कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.  
  
शेवटी निसर्ग श्रेष्ठ की माणूस श्रेष्ठ या वादात न पडता जेव्हा जेव्हा निसर्ग मानवाला अनुकुल असेल त्यावेळेस मानवाने निसर्गाचा लाभ घ्यावा.निसर्ग प्रतिकूल असेल अशा काळामध्ये त्याने शांत राहणे गरजेचे आहे. निसर्गाशी दोन हात न करता निसर्गाच्या हातात हात घालून चाललो तर अशा येणाऱ्या संकटावर माणूस सहजपणे मात करू शकेल.          
    @ सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. लेखकाच्या परवानगीशिवाय लेख किंवा लेखामधील मजकूर प्रकाशित करण्यास मनाई आहे.

No comments:

Post a Comment

लालपरी पळली पाहिजे.

पूर्वी गावांमधील लालपरी म्हणजेच एसटी यायची तेव्हा तिच्या स्वागतासाठी आबालवृद्ध हजर असायचे. आपल्या गावांमध्ये एसटी येते याचा त्यांना अभिमान  ...