Wednesday, September 1, 2021

ही वाट दूर जाते ...............कुमशेत ! ( अकोले ) भाग - १





निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेली डोंगर रांग म्हणजे सह्याद्री, वाऱ्यालाही धडकी भरवणारे उंच उंच शिखरे म्हणजे सह्याद्री , भटक्यांचे माहेरघर म्हणजे सह्याद्री आणि जगातील सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या प्रदेशांपैकी एक सह्याद्री. हाच सह्याद्री कधी कणखर रूप घेऊन शत्रूला नेस्तनाबूत करतो तर कधी आपल्या पिल्लांना अंगाखांद्यावर खेळवतो.

भटक्यांची पंढरी अर्थातच हरिश्चंद्रगड सर्वांना माहीत आहे. हरिश्चंद्रगडाचा ट्रेक करणे म्हणजे भटक्यांचे स्वप्न, येथील कोकणकडा बघणेच नव्हे,तर अनुभवणे हा एक थरारच. हरिश्चंद्रगडावरील महादेवासमोर नतमस्तक होणे, सह्याद्रीच अवाढव्य पण तितकेच मनमोहक रूप डोळ्यात साठवणं यापेक्षा भटक्यांचं जगणं काय वेगळ असतं.

हरिश्चंद्रगडाच्या जवळच असलेलं कुमशेत एक अहमदनगर जिल्ह्यातील शेवटच गाव. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर, आणि अहमदनगर जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव कुमशेत( सहा वाड्या मिळून.) तब्बल 3027 हेक्टर क्षेत्र या गावाला लाभले असून त्यातील 2688 हेक्टर क्षेत्र वनविभागाकडे आहे. यावरून या गावात वनक्षेत्र किती आहे याचा अंदाज येतो.

राजूर पासून कुमशेत कडे जाताना हळूहळू सृष्टीचे, निसर्गाचे वेगवेगळे रंग, रूप आपणास बघायला मिळतात. नवे हिरवे शालू लपेटून हे गिरीशिखरे आपले स्वागत करतात. वातावरणातील, निसर्गातील हळूहळू होणारा बदल मनाला भावून जातो. नागमोडी वळणे घेत, उंच उंच डोंगरांना वळसे घालुन जसजसे आपण पुढे जातो तसतशी निसर्गाची वेगळीच नजाकत बघायला मिळते. बाहेरच्या मानवी स्पर्शापासून, प्रदूषणापासून मुक्त असलेले हे निसर्गरम्य गाव.

कुमशेतकडे जातानाच शिरपुंजे धबधबा आपले स्वागत करतो. जसजशे पुढे जाऊ तसे अनेक धबधबे आपले लक्ष वेधून घेतात. धबधब्यांची एक आगळीवेगळी साखळीच निसर्गाने तयार केली आहे.शुभ्र, फेसाळणारे आणि उंचावरुन पडणारे धबधबे आपणास स्वप्नांच्या गावात घेऊन जातात. चोंडीचा, कळकीचा, घोडपावलीचा, पायराचा, दमसोका, सिंदोबाचा या व अशा अनेक धबधब्यांची गुंफण निसर्गाने आफलातुन केली आहे.

प्रवरा नदी बरोबर अहमदनगरच्या काही तालुक्यांना वरदान ठरलेली मुळा नदी येथेच आजोबाच्या डोंगरात उगम पावते. आजोबांची ही नात छोटी असली तरी खूप अवखळ, अल्लड आहे. अगदी जोराने पळत पडत उंचावरून खाली उडी घेत ती पुढे पुढे जाते. नदीच्या पात्रातील असंख्य धावत्या आपले लक्ष वेधून घेतात.पात्र जरी छोटे असले तरी पाण्याचा प्रचंड वेग धारेराव मंदिराकडे जाण्यास अडचण करतो. अर्थात आम्ही त्यावर मात करून पुढे गेलो हे सांगणे न लगे. खरेतर माहीतगार व्यक्ती असल्याशिवाय या भागाकडे जाऊच नये.

माझ्याबरोबर कुमशेतचे सरपंच श्री. सयाजी अस्वले. श्री. किरण औटी व श्री.गोंदके हिरामण हे शिक्षक होते एकमेकांचे हात पकडून मुळा नदीचे पात्र ओलांडून धारेराव मंदिरात पोहोचलो.

धारेराव अस्वले म्हणजे या भागातील इंग्रजांच्या विरुद्ध प्रखरपणे लढणारे क्रांतिकारक. कोकण कड्याजवळच धारेराव अस्वले यांचे मंदिर बांधण्यात आले आहे अजूनही धारेरावांचा संचार कुमशेतच्या परिसरामध्ये आणि वनरायामध्ये आहे तेच अजून वनरायांचे, पशुधनाचे व आदिवासी बांधवांचे रक्षण करतात असे आदिवासी बांधव मानतात.

धारेराव मंदिरच्या पुढे काही अंतरावर कोकणकडा आहे. भिरभिरणारा वारा मनात धडकी भरवतो. पावसाळ्यात येथे असंख्य रिव्हर्स फॉल मोत्यांची उधळण आपल्या अंगावर करतात. धारेराव मंदिर जरी नगर जिल्ह्यात असले तरी कोकणकडा मात्र ठाणे जिल्ह्यात येतो. येथेच खूप उंच लोखंडी मनोरा वन खात्यातर्फे उभारला आहे. येथून सभोवतालचे विहंगम दृश्य दिसते. येथूनच अगदी माळशेज घाटातील वाहतूक दिसते. खूप वेळा या भागांमध्ये धुके पडते आणि धुके पडले की निसर्ग नजरेत साठवता येत नाही. कधीतरी येणारे धुके, सप्तरंगाची उधळण करणारे इंद्रधनुष्य, ओढ्याचे खळाळणारे पाणी, मधूनच पडणारे उन, आणि अचानक येणार्या श्रावण सरी शरीराबरोबर मनालाही ओलंचिंब करून टाकतात. ह पिवळ्या रंगाचा जनु सडाचं शिंपडला,                                    जनु वाटे धर्तीवर स्वर्गच अवतरला...

हे सर्व अनुभवल्यावर बालकवींच्या काही ओळी ओठावर आल्या

'श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे; क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे.
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे'
मरगळलेल्या मनाला व आळसलेल्या शरीराला संजीवनी देण्याचं काम कुमशेत परिसरातील स्वच्छ हवा,टवटवीत निसर्ग, भारावलेले वातावरण करत असते. अशा भागात दोन-तीन दिवस राहिल्यास जीवनाकडे, निसर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणखीन सकारात्मक होईल यात शंका नाही.
काळोबा, मारुती, कळमजाई, धारेराव, कात्राई, सिंदोबा अशा सहा वनराया अजूनही गावकऱ्यांनी जपून ठेवल्या आहे. वनरायांतील झाडांची दाटी व त्यांची उंची बघितली की आपण किती थिटे आहोत याची जाणीव होते या वनरायांमध्ये व कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात( 361 चौ.कि.मी.) आंबा, जांभूळ, बेहडा, उंबर, कळंब, सादडा, अर्जुन, आवळा, लोखंडी, हिरडा धामण, सावर, , बेल, पागांरा, बहावा, मोह, तांबट, चंदन, अर्जुन सादडा रिठा, पळस, यांसारखी अनेक प्रजातींची वनसंपदा दिसून येते. कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात बिबळ्या, वाघ, जंगली मांजर, कोल्हा, तरस, भेकर, रानडुक्कर, मोर, मोठे घुबड, वानर, माकडे, शेकरू, सायाळ, सांबर, निलगाय, घोरपड हे प्राणी आढळतात. दिवसभर भटकूनही वानराचे दर्शन सोडता इतर प्राण्यांचे दर्शन झाले नाही. अंगावर ठिपके असणाऱ्या डांग्या गाया मात्र भरपूर आहे.
रात्रीच्या जेवणात तांदळाच्या भाकरी बरोबर डांग्या गायीच्या दुधाने बनवलेली कढी जेवणाची लज्जत वाढवून गेली.
सरपंच श्री. सयाजी अस्वले व आमचे मित्र यांच्याबरोबर रात्री अकरा वाजता खेकडे पकडण्याचा अनुभव घेतला. श्रावण असल्यामुळे आम्ही जरी खेकडे खाल्ले नाही तरी हा अनुभव आमच्यासाठी खूपच रोमांचकारी, थरारक होता. छंद म्हणून नव्हे तर जीवनाच्या,जगण्याच्या लढाईसाठी आदिवासी बांधवांना ही रात्रीची लढाई कायमच करावी लागते. रात्रीच्या निरव शांततेत धबधब्याचा प्रचंड आवाज, रातकिड्यांचा कर्कश, भीतीदायक आवाज हे सर्व अनुभवता आले ते सरपंच सयाजी आस्वले यांच्यामुळे. पूर्वी खेकडे पकडण्यासाठी उजेड म्हणून राँकेलच्या मशालीचा वापर केला जायचा, आता मात्र टॉर्चचा वापर केला जातो.
धबधब्यांची जशी उत्कृष्ट गुंफण या गावाला आहेत तशिच गुंफण साखळी बंधाऱ्यांची आहे. भात हे जरी येथे मुख्य पीक असले तरी 16 बंधाऱ्यामुळे गहू किंवा इतर पिके ही नंतरच्या कालावधीमध्ये घेता येतात. जलसंधारणाची चांगली कामे कृषी व वनखात्याच्या मार्फत झाली आहे.

नगर जिल्ह्यातील सर्वात जास्त बांबूचे क्षेत्र ही याच गावात असावे. गावातील काही तरुणांनी गुजरात, छत्तीसगड या ठिकाणी जाऊन बांबू प्रशिक्षण घेऊन गावात बांबू पासून छोट्या छोट्या वस्तू बनवायला सुरुवात केली आहे. काही वस्तू बघता आल्या. अतिशय आकर्षक छान पद्धतीने या वस्तू तयार केल्या आहेत.

एकीकडे निसर्गाची मुक्त उधळण होत असताना गावात जाण्यासाठी रस्त्यांची देखभाल होणे गरजेचे आहे. मोबाईलची कनेक्टिव्हिटी नाही. तीस पस्तीस किलोमीटर अंतरावरील राजूर हेच मुख्य बाजारपेठेचे गाव. अगदी माणूस आजारी पडला तरी राजूरला जावे लागते. या गोष्टीकडे सरकारने लक्ष दिल्यास नक्कीच या गावाची पर्यटनदृष्ट्या भरभराट होऊ शकते.

कुमशेत गावातच वन विभागाने पर्यटन निवास उभारले आहे. गावच्या प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ हे पर्यटन निवास आपली वाट पाहते. किरकोळ कामे वगळता ते पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. काही धबधबे रस्त्यावरून जाताना लक्षात येत नाही त्या ठिकाणी फलक असणे गरजेचे आहे. वनखात्याने, कृषी खात्याने अजून लक्ष दिले तर पर्यटनाच्या नकाशावरती हे गाव चमकेल यात शंका नाही.

श्री.सयाजी अस्वले हे या गावचे तरुण सरपंच. गावाच्या विकासासाठी काही योजना त्यांच्या मनात आहे. हरहुन्नरी सरपंच, पर्यटनप्रेमी असल्यामुळे आपले गावही पर्यटनाच्या नकाशावर चमकावे असे त्यांना वाटते. आलेल्या पर्यटकांना राहण्याची व्यवस्था करण्यापासून तर गावचा इतिहास, गावातील अडचणी. गावची माहिती, आलेल्या पर्यटकांना मार्गदर्शन करणे. गावच्या विकासासाठी अधिकाऱ्यांची संपर्क ठेवणे, असा सरपंच गावाला लाभला हे ही नसे थोडके. दर शनिवारी रात्री आदिवासी नृत्यांचा व आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन होईल.त्यांचा मोबाईल नंबर (9922257664) फोन न लागल्यास जाताना व्हाट्स अँपवर मेसेज टाकणे.

आजूबाजूची पाहण्यासारखी ठिकाणे. हरिश्चंद्रगड, भंडारदरा, प्रवरेचे उगमस्थान रतनगड,कोकणकडा, सांदण दरी,अंबित धरण, रंधा फॉल,
कसे जाल.
1) मुंबईपासून शहापूर इगतपुरी- -अकोले -राजूर-कुमशेत ( 193कि.मी. )
2) पुणे - नारायणगाव आळेफाटा- ओतूर-कोतूळ- कुमशेत ( 175 कि.मी )
3) नाशिक -भगूर- शेणित फाटा- धामणगाव- टाकेत- बारी- शिरपुंजे.( 96 कि.मी.)
पर्यटनाला जाण्याचा उत्तम कालावधी.
सप्टेंबर ते जानेवारी
कुमशेत ला जाण्यासाठी
राजूरवरून एसटी महामंडळाच्या मर्यादित बस आहे. स्वतःच्या गाडीने प्रवास फायदेशीर.
@ सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.
श्री.अशोक राहिंज.
विद्या विकास मंदिर. राजुरी. तालुका जुन्नर जिल्हा पुणे. 19.8.2021









          मी सह्याद्री वेडा.



2 comments:

  1. अशोक महाराष्ट्राचे काश्मीर असणारे अकोले तालुक्यातील पश्चिमघाट परिसर अशोक तू पायी फिरून आनंद लुटतोय व तो आनंद तुझ्या लेखणीतून आमच्या पर्यंत पोचवतो.हे प्रवास वर्णन जिवंत स्वरूपात मांडतो.खूप खूप शुभेच्छा!

    ReplyDelete

लालपरी पळली पाहिजे.

पूर्वी गावांमधील लालपरी म्हणजेच एसटी यायची तेव्हा तिच्या स्वागतासाठी आबालवृद्ध हजर असायचे. आपल्या गावांमध्ये एसटी येते याचा त्यांना अभिमान  ...