🏇🏽🎠निसर्गाचे नवल 'सांदण दरी '🌄 सांदण दरी ला जायचं सांदण दरी ला जायचं असं कितीतरी दिवसापासून चाललं हाेतं बऱ्याच वेळा ठरवलं पण वेगवेगळ्या कारणांमुळे जाणं झालं नाही. नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न या म्हणीची पुरेपूर प्रत्र.त्रचिती आली होती .
णयमलयाडलददझण घमक्षत्रत्रादत्रत्ररघहहैत्रय या वर्षाची शिवजयंती सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये करायची व शिवरायांना अभिवादन करायचे असे ठरविले .सर्व मित्रांना अगोदरच्या दिवशी फोन केले. शिवजयंतीच्या दिवशी सकाळीच आळेफाट्यवरून सहा वाजता सांदण दरीकडे कूच करण्याची ठरले.वाऱ्याच्या वेगाने संगमनेरला निघालो, योगायोगाने वाटेतच आमचे मित्र प्राध्यापक जोंधळे सर यांची भेट झाली. ते व सहकारी शिवज्योत घेऊन गावी चालले होते. गाडीतून खाली उतरून काही वेळ शिवज्योत घेऊन धावलो . शिवज्योत घेऊन निघणाऱ्या मावळ्यांना शुभेच्छा दिल्या व पुढे भंडारदऱ्याच्या मार्गाला लागलो.
संगमनेर वरून फोन करून घाटघरचा असणारा गुडनर कुंडलिकला अकोल्याला रस्त्यावरच थांबायला सांगितले त्याला घेऊन राजूरला हलकाफुलका नाष्टा करून पुन्हा भंडारदर्याच्या दिशेने आमचा घोडा उधळला. आम्हाला अमृतेश्वराचे दर्शन घ्यायचे असल्यामुळे आम्ही रतनगडाच्या बाजूने निघालो.
सांदण दरिकडे जाताना एका प्रवासी गाडीचे शंभर व प्रत्येक व्यक्ती तीस रूपयाची पावती फाडावी लागते . भंडारदराच्या बॅकवॉटरच्या कडेकडेने अमृतेश्वर ला पोचलो.
समोर पसरलेला अथांग महासागर उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेला आहे उत्तर नगर जिल्ह्याची भरभराट झाली ती याच धरणामुळे अमृतेश्वर हे अकराव्या बाराव्या शतकातले महादेवाचे मंदिर असून हेमाडपंथी धाटणीचे आहे उत्कृष्ट शिल्पकला जर बघायचे असेल तरी या मंदिराला भेट नक्कीच द्यायलाच हवी. भोलेनाथ चे दर्शन घेत असताना एक गोष्ट नवलाईची वाटली ती म्हणजे महादेवाच्या पिंडीसमोर दोन नंदी आहेत .आत्तापर्यंत जिथे जिथे गेलो तिथे प्रत्येक पिंडीसमोर एकच नंदी असतो येथे दोन नंदी का आहेत? याचे मात्र कोडे मनाच्या कप्प्यात तसेच आहे.धरणाच्या कडेला असलेले अमृतेश्वराचे मंदिर,आजूबाजूला सह्याद्रीच्या उंच-उंच रांगा, जंगलातल्या वेगळ्या फळांचा फुलांचा,पानाचा सुगंध आपणास मोहित करतो. येथील पुष्करणी अतिशय सुंदर, वेगळ्या धाटणीची तीही आवर्जून बघायला हवी. हा परिसर अतिशय रमणीय,पवित्र निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. मंदिराची जागा निवडणा-याला मनोमन सलाम केला. कारण देवांचा वास रमणीय,पवित्र ठिकाणीच असतो म्हणून त्यांनी या जागेची निवड केली असावी. या जागेवरून पाय हलत नव्हता पण मनात ओढ होती ती सांधण .दरीची त्यामुळे तेथे जास्त न रेंगाळता आम्ही पुन्हा सांधण दरीच्या दिशेने मार्गस्थ झालो.
आळ्याफाट्यापासून जवळजवळ दीडशे किलोमीटर असलेल्या सांम्रद गावाजवळ आमच्या रथाचे सारथ्य करणारे संतोष गोपाळे सर यांनी गाडी थांबवली. माकडासारखे उड्या मारून गाडीच्या बाहेर आलो समोरचे अलंग, कुलंग, मलंग सह्याद्रीचे पहारेकरी आमच्याकडे माना वर करून बघत होते, कुणी परका तर आला नाही ना, मावळेच आले याची खात्री पटल्यानंतर पुन्हा ते निर्धास्त झाले. प्रत्येकाने पाठीवरती आपापली बॅग घेतली. बॅगमध्ये पाण्याची बाटली डोक्यावर हॅट, डोळ्याला गाँगल, पायात शूज, डोक्यात सांदण दरीबाबतची उत्सुकता, हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या नावाने आरोळी देत दरी कडे निघालो. गाडी पार्क केल्यापासून अगदी दहा मिनिटातच सांदण दरीला सुरुवात झाली. हा ट्रेक आहे तो पूर्ण उतरण्याचा, कुठे चढाई करायला लागत नाही पण दरीत उतरणे सोपं नाही हे सांधण दरी अनुभवल्यानंतर कळते छोटे छोटे गोटे दगडांनी गोट्यांनी सुरू होणारी सांधण दरी काही वेळातच प्रचंड आकाराचे राक्षसी दगड खडक आपली वाट अडवायला उभीच असतात.आपण जसजसे पुढे जातो तसतसा या दरीचा अनुभव थरारक असतो .अंगावर काटे येतात काही ठिकाणी दोन दगडांच्या पोकळीतून आपणास हळूहळू पुढे सरकावे लागते ही दरी बघितलं तर मला गोविंदाग्रजांच्या काही ओळी आठवलया
मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा.
किती सार्थ वर्णन केले आहे सह्याद्रीचे नवल म्हणजे सांदण दरी….. एका अतिप्राचीन भौगोलिक प्रस्तरभंग रेषा म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच... .हजारो वर्ष सह्याद्रीच्या डोंगर रांगा वरून वाहाणाऱ्या पाण्यांनी ही दरी आणखीन रुंदावली आहे, कापली आहे. दरीच्या दोन्ही बाजूला काळा कातळ भिंती मनाचा थरकाप उडवतात काही दगड पडण्याच्या परिस्थितीत आहे. जशी मोठ मोठे दगड आपली वाट अडवतात तसे अनेक ठिकाणी पाण्यातून पुढे जावे लागते नवीन माणसाला पाण्याचा अंदाज येत नाही . त्यामुळे हळूच एक पाय पाण्यात टाकला मग दुसरा मग तिसरा भीती, नवल, आश्चर्य ,उत्सुकता सगळ्या गोष्टी एकाच वेळेस मी अनुभवत होतो पाण्यात चालता चालता अचानक छातीपर्यंत पाणी लागले अर्थात मागून काही मित्र धीर देत होते पण आम्ही कधी हातात हात घेत, एकमेकांना धीर देत पाण्याला पार करून गेलो. पाणी इतके थंड होते की मला माझ्या काश्मीरच्या प्रवासाची आठवण झाली. त्यावेळेस नद्या पार करताना प्रचंड थंड पाणी असायचे मला तर वाटले जास्त वेळ आपण पाण्यात राहिलो तर आपले पाय बधिर होईल मी पुढे गेल्यानंतर हळूहळू सुनिल पवार, अंगद उदमले ,किरण औटी, हिरामण गोंदके यांची फौज पुढे आली पण आमचे सारथ्य करणारे संतोष गोपाळे ,शंकर पवार, सिद्धू पवार हे मात्र मागेच थांबले बरोबर 12 वाजता आम्ही निम्मी सांदण दरी पार केली होती सांधण दरी म्हणजे उन सावल्यांचा खेळ. दोन्ही बाजू उंच असल्यामुळे सूर्यप्रकाश लवकर येत नाही आला तरी लख्ख प्रकाश पडत नाही हे दृश्य अतिशय सुंदर विलोभनीय अद्भुत आहे याचा अनुभव आपण घ्यायलाच हवा. दरीत हवा बाहेर पेक्षा खूपच थंड असते.
सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळणे इतकं सोपं नाही आपण जसेजसे पुढे जातो तसतशी दोन्ही कडच्या भिंतींची उंची वाढत जाते काही ठिकाणी हे भिंतीकडे दीडशे फुटापर्यंत आहे राकट . कणखर सह्याद्री . . . आसमंताला भिडलेल्या उंचच उंच शिखरांचा सह्याद्री . . खोलच खोल द-या- खो-यांचा सह्याद्री,काळजाचा ठोका चुकविणान्या कोकणकडांचा सह्याद्री, . .हिमालयाची पाठराखण करणारा सह्याद्री, निसर्गसंपत्तीने नटलेला सह्याद्री, शिवरायांसारख्या वाघाला जन्म देणारा सह्याद्री. .किती किती सह्याद्रीची रुपये आपणास दिसतात .अर्थात नटलेला सह्याद्री बघायचा असेल तर पावसाळ्यात जायला हवे अर्थात तुम्ही पावसात आले तर तुम्हाला सांधण दरी मध्ये उतरता येणार नाही कारण प्रचंड पाण्याचा दाब,घोंगावत येणारे पाणी त्याचे ते रौद्र रूप बघितल्यानंतर सह्याद्रीच्या पाण्याबरोबर दोन हात कोण करेल? म्हणून ज्याला सांधण दरी वरून बघायची व निसर्गसौंदर्य लांबून अनुभवायचे बघायचे त्याने पावसाळात जायला हवे ; पण सांदण दरीच्या आत जायचे असेल तर डिसेंबर ते मार्च या कालावधीत गेल्यास तुम्हाला दरीमध्ये उतरून शेवटपर्यंत जाता येते .पाण्याला पार करत असतांना आम्ही शूज काढून ठेवल्यामुळे औटी किरण व मी अनवाणी पायानेच सांधण दरी पार केली हजार वर्ष या दरीतून पाणी वाहिल्यामुळे दगडे एकमेकाला घासून बर्यापैकी गोल गोल झाले आहेत आणि या वरुन चालताना काळजी घ्यावी लागते .काही ठिकाणी कपारीला घोरपडी सारखी बोटे रोवून भिंतीला आलिंगन देऊन एकेक पाय टाकून आपणास हळूहळू कासवासारखे पुढे सरकावे लागते. अजूनही दरी खूप पुढे होती पण खाली जायचं असेल तर या रॅपलिंग करावे लागते. ते साहित्य आमच्याकडे नसल्यामुळे व पोटात कावळे ओरडायला लागल्यामुळे घाटघरला जाण्याचा निर्णय घेतला. आमच्या बरोबर असलेल्या कुंडलीकला आम्ही आधीच जेवण बनवायला सांगितले होते. वाढण्याची तयारी होत असतानाच संतोष गोपाळे सर पेंगायला लागले इतक्या गर्दीत गडबडीत आवाजात त्यांना पेंगायला कशी येते हा प्रश्न माझ्यापुढे नेहमीच असतो.
काही वेळाने गावाला चक्कर मारून आलो. अतिशय सुनियोजित असे नवे घाटघर गाव शासनाने वसवले आहे.फिरून येईपर्यंत जेवणाची ताटे तयार झाली होती. चिकन भाकरीवरती येथेच्छ ताव मारून गावाला वळसा घालून घाटण देवीचे दर्शन घेतले.येथे अहमदनगर जिल्हा संपतो व ठाणे जिल्हा सुरू होतो. समोरच अलंग मलंग कुलंग किल्ले आम्हास बोलावत होते, खुणावत तिथूनच त्यांना हात जोडले व परतीचा प्रवास सुरू केला आता मात्र आम्ही ज्या बाजूने आलो त्याच्याविरुद्ध बाजूकडून म्हणजे कळसुबाईच्या बाजूकडे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आम्हाला साद घालत होते. पण एव्हाना खूपच संध्याकाळ झाली होती पुन्हा परिसर पायाखाली घालण्यासाठी सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळण्यासाठी आम्ही येणार होतो कळसुबाई कडे पाहत मला गीत आठवले भव्य हिमालय तुमचाअमुचा, केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा
तुमच्याअमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला
धिक तुमचे स्वर्गहि साती
इथली चुंबिन मी माती
# कसे जाल #
1) पुण्यापासून आळेफाटा ,ओतुर ,ब्राह्मणवाडा, कोतुळ, भंडारदर्यामार्गे 194 किमी.
2) नाशिक वरून घोटीमार्गे 92 किमी आहे
3) मुंबई ठाणे,आसनगाव ,इगतपुरी मार्गे 185 किमी सांदण दरी आहे .
भंडारदरा जवळ असलेल्या शेंडी मध्ये उत्कृष्ट प्रकारचे हॉटेल असून तेथे आपणास मुक्काम करता येतो . या शिवाय सांदण दरीच्या शेजारी असलेल्या सांम्रद गावीही घरगुती जेवणाची व मुक्कामाची स्थानिक लोकांकडे सोय होऊ शकते.🙏🏻🙏🏻🌹19 .2.2019🙏🏻🙏🏻
श्री. अशोक राहिंज.
विद्या विकास मंदिर राजुरी .
तालुका जुन्नर जिल्हा पुणे
सांधण दरी बघितल्याचा आनंद मिळाला.एकच नंबर
ReplyDeleteअशोक अतिशय अप्रतिम लिहितो. अशोक तुझ्या प्रवास वर्णननाला नक्कीच योग्य अशा पाठयपुस्तकात प्रसिध्दी मिळेल याची मला खात्री आहे
ReplyDeleteChaan
ReplyDeleteआपल्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून नक्कीच माझा उत्साह वाढतो. माझ्या लिखाणावर प्रेम म्हणजे सह्याद्रीवर प्रेम.
ReplyDeleteअशोक आत्ता तुझ्या लेखनाला साहित्यिक धार आली आहे . तू असेच लिहीत जा .तुला लेखक म्हणून जग मान्यता मिळण्याची वेळ जवळ आली आहे.👌👌💐💐
ReplyDeleteसर अप्रतिम सफर... दृश्य इतकीच सुंदर वर्णन शैली. अप्रतिम मांडणी. त्यामुळे आपण स्वतः सफरीवर गेलो आहे याची जाणीव होते .अत्यंत उत्कृष्ट प्रकल्पा सारखी वर्णन शैली .आपल्या वर्णन शैलीवर प्रेम करावे इतकी उत्कृष्ट .हे कौतुक नाही ,तर तसेच जाणवते आपल्या छंदाला खूप खूप शुभेच्छा!
ReplyDelete