आडवाटेवरचे 'आडराई' जंगल.
आळेफाट्यावरून सकाळी साडेआठला निघून ओतूरला गरमागरम कांदा भजी व बटाटा भजीचा नाश्ता करून खुबी फाट्याच्या दिशेने गज ( हत्ती ) चालीने चाललो. कारण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहे हेच समजत नाही. कधी आदळत, आपटत तर कधी खड्डे चुकवत पिंपळगाव जोगा धरणाचे स्वच्छ आणि निळेश्वर पाण्याचे विलोभनीय दृश्य बघत नागेश्वर मंदिराजवळ पोहोचलो. समोरच्या दलदलींमध्ये अनेक बगळे कीटकांवर ताव मारत होते तर गुराखी गाया चारण्यासाठी घेऊन चालले होते.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |
पक्षीही सुस्वरे आळवीती ||
येणे सुखे रुचे एकांताचा वास |
नाही गुणदोष अंगा येत ||
आकाश मंडप पृथिवी आसन |
रमे तेथे मन क्रीडा करी ||
खरोखरच तुकाराम महाराजांचा हा अभंग आणि सभोवतालचे वातावरण एकमेकास साजेसे होते. हरिश्चंद्रगडाच्या बाजूला प्रचंड दाट झाडी वर निळे आकाश आणि समोर शांत पण तेवढाच गुढ असणारा निळाशार जलाशय, स्वच्छ सूर्यप्रकाश, आणि मनाला धुंद करणारे बेधुंद वातावरण यापेक्षा वेगळे काय हवे.
कंथा कमंडलु देह उपचारा |
जाणवितो वारा अवसरु ||
हरिकथा भोजन परवडी विस्तार |
करुनि प्रकार सेवू रुचि ||
तुका म्हणे होय मनाशी संवाद |
आपुलाचि वाद आपणासी ||
खरोखरच या जुन्नर तालुक्याच्या सह्याद्रीच्या उत्तुंग रांगा, घनदाट झाडी, अष्टविनायकापैकी दोन विनायक येथील सृष्टीसौंदर्य पाहूनच जुन्नर तालुक्यात विराजमान झाले असतील.
खरोखरच जुन्नर तालुक्याचा पश्चिम पट्टा म्हणजे निसर्गसौंदर्याचे माहेरघर.
जुन्नर तालुका म्हणजे पर्यटनाची नवलाई, जुन्नर तालुका म्हणजे विविध प्रकारच्या खाद्यान्नाची मेजवानी, जुन्नर तालुका म्हणजे सह्याद्री वरदहस्त जुन्नर तालुका म्हणजे जैवविविधतेची अंकलीपी, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जुन्नर तालुका म्हणजे सह्याद्रीचा वाघ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी.
जुन्नर तालुक्याला इतिहासाची जशी मोठी परंपरा आहेत तसाच जुन्नर तालुक्याचा भूगोल ही मोठा आहे. सातवाहन काळापासून नाणेघाट हा व्यापारासाठी प्रसिद्ध होता. त्या नाणेघाटाने
जोडणाऱ्या दोन प्रदेशाची जागा आता जगप्रसिद्ध माळशेज घाटाने घेतलेली आहे. एकाच तालुक्यात पाच धरणे असलेला तालुका आणि बरंच काही ऐतिहासिक आणि भौगोलिक. आणि याच गोष्टींची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने पहिला पर्यटन तालुका म्हणून जुन्नरची घोषणा केली.
हेमाडपंथी नागेश्वर मंदिर आपणास इतिहासाच्या पाऊलखुणा उलगडून दाखवते. अगदी दहाव्या शतकात पर्यंत शिलाहार वंशातील झंज नावाचा राजा या भागात राज्य करत होता त्याने गोदावरी ते भीमा या दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थाना जवळ शिवालये उभारली त्यातील एक नागेश्वर मंदिर.
येथील शिल्पकला आखीव, रेखीव असली तरी आता या मंदिरावर आणि मंदिराचा शिल्प कलेवर काळानेही आपल्या खुणा उमटवलेल्या आहेत.
या मंदिरातील महादेवाचे दर्शन घेऊन बाहेर येत असतानाच गावकऱ्यांनी महाप्रसाद घेण्याचा आग्रह केला. भात आमटी आणि बुंदी यांचा महाप्रसाद घेतला. मंदिरा पासूनच पाच मिनिटाच्या अंतरावर अपरिचित राजवाडा लेण्या आहेत त्यावर सुंदर दगडी शिल्प कोरलेले आहे .शेजारी एक पाण्याची टाकी दिसते. या लेण्यांबद्दल फारशी माहिती मिळाली नाही.
लेण्या बघितल्यानंतर काळु धबधब्याकडे गेलो. सोनकीची फुले अधून-मधून आमचे स्वागत करत होती. तर काही खेकडे आमचं आवाज ऐकून गवतामध्ये लपत होती. मध्ये मध्ये डोंगरातून येणारे आडवे निर्झर आवाज करत आम्हाला साथ देत होते.
अडीच तीन किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर अगदी समोर गेल्यानंतर काळू धबधब्याचे नयनरम्य दृश्य आपल्या दोन डोळ्यात साठवता येत नाही. काळू नदीवरील हा धबधबा हजार-बाराशे फूट तीन चार टप्प्यात पडतो. त्याचे फेसाळणारे शुभ्र रौद्र रूप बघायला शेकडो लोकांची झुंबड उडालेली होती. समोरून तटस्थ नजरेने उधळ्या व सिंदोळा किल्ला काळू धबधब्याकडे बघत असतो. काळू धबधबे जाच उजव्या बाजूला आणखीन एक मोठा धबधबा नागिन ज्या वेगाने पळते त्या वेगाने जमिनीकडे झेपावत होता. हा धबधबा या अगोदर तीन चार वेळेस बघितला होता.
आज काळू धबधबा पुन्हा बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी मुद्दाम खास माझ्या मित्रांसाठी आलो होतो. माझ्या बरोबर माझे कॉलेजचे मित्र, पुणे येथील जेधे कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, लोणावळा येथील पुरंदरे कॉलेजचे प्रा.डॉ. लांडगे, मंचर कॉलेजचे प्रा. मारुती गुंजाळ आणि नगर कॉलेजचे प्रा. माधव रेवगडे, प्रा. गाडगे, प्रा. काळे आणि माझे नेहमीचे सहकारी हिरामण गोंदके होते.काळू धबधबा बघून आम्ही सर्वच स्वर्गीय आनंद घेत होतो पण मला उत्सुकता होती ती
आडवळणाच्या आडराई जंगलात जाण्याची.
काळू धबधब्याकडे पुन्हा एक एकटक बघत त्याचा निरोप घेतला आणि आमची मजल-दरमजल आडराईच्या जंगलाकडे सुरू झाली. थोडे पुढे गेल्यानंतर गायकवाड सरांनी थांबण्याचा इशारा दिला आता आपण परत मागे जाऊ,पुढे जायला नको असे ते म्हणत होते. जे जंगल बघण्यासाठी आलो ते अजून सुरूच झाले नव्हते. जंगल बघितल्याशिवाय माघारी फिरायचे नाही असा आमचा हट्ट होता. मधल्या काळात सरांना कोरोणा झाल्यामुळे त्यांना शारीरिक थकवा जाणवत असावा. पण हळू जाऊ, आम्ही सर्व जण आहोत असा मानसिक धीर देत सरांना तयार केले. हळू हळू आडराईच्या जंगलाला सुरुवात झाली.
आपल्याकडे जसे देवराईचे जंगल तसेच आडराईचे जंगल बहुतेक ते आडबाजूला असावे म्हणून त्याला आडराईचे जंगल म्हणत असावे. खरोखर मानवी स्पर्शापासून दूर असल्यामुळेच हे जंगल आजही सुरक्षित आणि सुस्थितीत आहे. जंगलातील पायवाटेच्या दोन्ही बाजूंनी गर्द झाडी, झाडीच्या एका बाजूला डोंगरकडा तर दुस-या बाजूला उंच उंच डोंगररांगा यातून मार्ग काढत,कधीतरी चिखलावरून घसरत एकमेकांना हात देत, साथ देत बरेच पुढे गेलो.
दोन्ही बाजूने उंच वाढलेल्या कारवीच्या कमानीतून पुढे जावे लागते. काही वेळ पायवाटेने चालल्यावर मध्येच आपणास भैरवाचे बन लागते तिथे भैरोबाची छोटी मूर्ती आहे त्यांचे दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ झालो. येथील जंगलात हिरडा, जांभूळ, चांदवा, बहावा, कुंभळ, गुलचावी, खारवेल, आवळी, बेहडा यांसारखे अनेक वृक्ष आढळतात.तर बिबळ्या, वाघ, जंगली मांजर, कोल्हा, तरस, भेकर, रानडुक्कर, मोर, मोठे घुबड, वानर, माकडे, शेकरू, सायाळ, सांबर, निलगाय, घोरपड पाहायला मिळतात. पण अधून मधून कोसळणाऱ्या सरीमुळे सर्व जंगल शांत होते.
किर्र झाडीतुन, कारवीच्या झुडपातून येणारे कवडसे अचानक येणाऱ्या पावसाच्या सरी, त्यातून होणारा आवाज, वार्यामुळे होणारी झाडांच्या पानाची सळसळ, मधेच येणारे दाट धुके, आपल्या भटकंतीला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. तेथील दगडांवर, खडकांवर आणि झाडांवर शैवालासारख्या वनस्पती उगवल्या आहेत, असे वाटते काही दिवस आपण थांबलो तर आपणही शैवालमय होऊन जाऊ.काळू धबधब्यापासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर गेल्यावर हरिश्चंद्रगडावरील तारामती शिखर आणि बालेकिल्ला दिसायला लागतो मी फोनच आपणास उंच डोंगरावर जुन्नर दरवाजाही दिसतो. येथील उंच उंच शिखरे बघितल्यानंतर उंच मला वसंत बापट यांच्या काही ओळी आठवल्या.
भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा ,मनांत पूजिन रायगडा
तुमच्या अमुच्या गंगा यमुना केवळ माझी भिंवरथडी
सततच्या पडणा-या पावसाने ओलेचिंब झालेले डोंगर अंग चोरून उभे असल्याचा भास होत होता, तर त्यावरून असंख्य वाहणारे छोटे छोटे ओहोळ त्या डोंगराला अंघोळ घालत होते. आणि त्या ओहळातून निर्माण होणारे धबधबे त्या शांत,सुंदर वातावरणाला साज चढवत होते. हे विलोभनीय दृश्य कॅमेरात पकडण्यासाठी आमचा गाईड लक्ष्मण तयार होता.
तिथून पुढे गेल्यावर पाच मिनिटातच धबधब्यांची एक मालिका दिसली ते शुभ्र, फेसाळणारे, स्वच्छ पाणी बघितल्यानंतर कोणता ट्रेकर स्वतःला आवरू शकेल. आम्ही मागचा पुढचा विचार न करता त्या धबधब्याखाली स्वतःला झोकून दिले. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत, पाण्यात ढकलत आम्ही पुन्हा कॉलेज जीवन आठवले, लहानपण अनुभवले. लहान मुलांसारखी दंगामस्ती केली. आमचा मोठेपणा, आमचं पद, आमची प्रतिष्ठा, धबधब्याच्या पाण्याबरोबर काही काळ वाहून गेली.
सगळे जग, भान, पद, प्रतिष्ठा विसरून जाण्याची जागा म्हणजे निसर्ग. तुम्ही एकदा निसर्गाचे झाला की निसर्गही तुमचाच होऊन जातो. मग हे उंच,उंच गिरीशिखरे आपणास साद घालतात. झाडांच्या फांद्यातून, पानातून वारा शिळ वाजवतो. धबधबेही आपल्यासाठी गात असतात. धुक्याची चादर आपल्या अंगावर केव्हा येते हे समजतही नाही.
परतीचा प्रवास पुन्हा त्याच पायवाटेने कधी झाडांच्या फांद्या धरून नागमोडी वळणे घेत घेत कारवीच्या जंगलातून चालतच असतानाच अचानक धोक्याच्या लाटेने वेढलो गेलो. काही वेळातच आकाशातून सहस्रावधी धारा धरेवर बरसायला लागल्या. किती हा निसर्ग अलौकिक, अद्भुत दुपारी निरभ्र असणाऱ्या आकाशात ढगांची दाटी झाली होती.अगदी पाच दहा मिनिटात पाणी पाणी झाले. पाऊस बरसायला लागल्यानंतर सह्याद्रीच्या ओड्यांना- नाल्यांना काही वेळातच प्रचंड पाणी येथे आणि या पाण्याला वेगही जास्त असतो. धुक्यामुळे दिशाही कळत नव्हत्या आमचा गाईड लक्ष्मण आमच्याबरोबर असल्यामुळे आमचा प्रवास सुखरूप निर्धोक झाला. दंडकारण्यात रामासाठी जी भूमिका लक्ष्मण निभावत होता तीच भूमिका आडराईच्या जंगलात लक्ष्मण मेमाने आमच्यासाठी बजावत होता.
लक्ष्मणच्या घरी येता येता संध्याकाळ झाली स्वयंपाक तयारच होता. गरमागरम जेवणावर ताव मारून लक्ष्मणचा निरोप घेऊन घराकडे मार्गस्थ झालो.
आडराईचे जंगल अनुभवण्यासाठी सप्टेंबर ते डिसेंबर कालावधी उत्तम आहे.
श्री. लक्ष्मण मेमाणे हे खिरेश्वरलाच राहतात त्यामुळे या परिसराची चांगली माहिती आहे. ते उत्कृष्ट गाईड म्हणून काम करतात व त्यांच्या घरी जेवणाचीही सोय होऊ शकते.
संपर्कासाठी त्यांचा मोबाईल नंबर 9049161862
मी सह्याद्री वेड या माझ्या फेसबुक पेजला भेट देण्यासाठी खालील लिंक वर जा.
खिरेश्वरची गूगल लोकेशन लिंक
कसे जाल
1) कल्याण वरून येताना खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे जाणे 90 कि.मी.
2) आळेफाटा पासून खिरेश्वर 45 कि.मी
3) खुबी बस स्टॉप ते खिरेश्वर 6 कि.मी.
श्री. अशोक राहिंज
विद्या विकास मंदिर
राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे.
20.9.2021
अशोक आपल्या फार दिवसानंतरच्या ट्रेकिंगच्या प्रवासाचे वर्णन हुबेहूब केले.अशोक तुला सह्याद्रीच बोलत करतो हे मात्र नक्कीच. तुझ्या लेखणीला अशीच धर येवो.
ReplyDeleteआपल्या लेखनातील प्रत्येक शब्द आणि अनुवाद मनाला स्पर्श करून जातात
ReplyDeleteसचित्र लेखनामुळे असे वाटले की मी पण तुमच्या सोबत आहे , खूपच छान ,पुढील भटकंतीसाठी शुभेच्छा
ReplyDeleteआपणा सर्वांचे धन्यवाद आपली प्रेरणा आपल्या शुभेच्छा मला लिहिण्यासाठी प्रवृत्त करतात
ReplyDelete